आज बहुमत चाचणी, सकाळी ११ वाजता हे अधिवशन सुरू होणार
महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य ठरविणारी बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल न्यायालयाने घेतली. म्हणूनच तब्बल तीन तासांचा युक्तीवाद दोन्ही बाजूने करण्यात आला. तो सर्व ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला आज बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांनी महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणले आहे. म्हणूनच भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. तसेच, बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात विनंती केली. त्याची दखल घेत राज्यपालांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार विधीमंडळाचे विशेष अधिवेशन उद्या बोलविण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता हे अधिवशन सुरू होणार असून त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे.