गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (20:31 IST)

अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

eknath shinde
औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.
 
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगरच्या चोंडी येथे आले होते. यानंतरच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला.
 
भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राम कदम यांनी मागच्या बऱ्याच काळापासून अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करावं अशी मागणी केली होती. तसंच काल रोहित पवारांनीही अहमदनगरच्या नामांतराची मागणी राज्य सरकारकडे केली होती.
 
याआधी राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं होतं. आता या दोन शहरांनंतर अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. नामांतराचा हा प्रस्वात आता मंत्रिमंडळात ठेवला जाईल आणि याबाबत केंद्र सरकारला कळवलं जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर होईल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor