गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (14:47 IST)

नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले हे गंभीर आरोप

nana patole
गेले अडीच वर्ष फारसे मतभेद जनतेसमोर येऊ दिले नसले तरी आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायचा असे म्हणत नाना पटोलेंनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पटोले हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती करताना शिवसेनेने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मित्रपक्षांना विश्वासात घेतले नव्हते. तर काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपद मिळावे असे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांना दिले होते. आता राज्यात परिस्थिती बदलली आहे. ठाकरे सरकार कोसळले असले तरी महाविकास आघाडी कायम असल्याचे दिसत आहे. म्हणूनच शिवसेनेकडून परस्पर निर्णय घेण्याच्या प्रकाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटतो आहे.
 
आघाडीत कोणताही निर्णय घेताना मित्रपक्षांशी चर्चा करायला हवी असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तर विरोधकांमध्ये एकोपा कायम हवा असे मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. या सगळ्यात अजित पवारांनी मात्र समन्वयाची भूमिका घेतलेली दिसते. विरोधी पक्षांपैकी ज्या पक्षाची संख्या जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता नियुक्त केला जातो. विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला आहे. तर विधानपरिषदेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले असल्याचे त्यांनी म्हणले आहे.
 
या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायचा ही भूमिका काँग्रेसची नाही. विधानपरिषदेचे पक्षनेतेपद देताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. महाविकास आघाडी म्हणून किमान चर्चा तरी करायला हवी होती असे त्यांनी म्हणले आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळाल्याने उद्धव ठाकरेंना उद्देशून त्यांनी असे म्हणले असल्याचे बोलले जात आहे.