नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या वाटेवर- धर्मेंद्र प्रधान
नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षं विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले.
लोकसत्ता तरुण तेजांकित' पुरस्कारांचे वितरण धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तर 'इंडियन एक्स्प्रेस' समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी धर्मेद्र प्रधान यांचा परिचय करून दिला.
"संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर 60 लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. 'देर आए लेकिन दुरुस्त आए' या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे", असे सांगत धर्मेद्र प्रधान यांनी नाव न घेता शिवसेनेला चिमटा काढला.
"या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल," असे धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं.