शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:14 IST)

नाशिकच्या सायकलस्वारांचा दिल्लीकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे २२ सायकलवीर देशाच्या राजधानीत दाखल झाले असून  ‘नेट झिरो इंडिया’ या उपक्रमांतर्गत दिल्लीकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली, जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी  स्वागत केले. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी ‘नेट झिरो इंडिया’ उपक्रमांतर्गंत 20 ऑक्टोबर 2021 पासून दिल्लीत राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संवर्धन विषयक जागरुकता कार्यक्रमाची माहिती दिली.
 
एकूण प्रदूषणाच्या टक्केवारीत वाहनांच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचे 25 टक्के एवढे प्रमाण आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार वातावरणात वाढत असलेल्या हरित वायूचे प्रमाण कमी होण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा या उद्देशाने ऐतिहासिक इंडिया गेटहून या उपक्रमाला सुरुवात झाली.

उपक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘इंडिया गेट’ आणि महात्मा गांधीजी यांचे समाधी स्थळ ‘राजघाट’ येथे या सायकलस्वारांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले. यासाठी पत्रके वाटली , मौखिक माहितीही दिली. आठवड्यातून एक दिवस “नो वेहिकल डे” पाळावा किंवा महिन्यातून एक दिवस सायकलचा वापर करावा व गाडीचा वापर टाळावा असा महत्वाचा संदेश त्यांनी दिल्लीकरांना पटवून देत आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यात प्रत्येकाचे योगदान लाभेल असे कळकळीचे आवाहन हे सायकलस्वार दिल्लीकरांना करीत आहेत. हे महत्वाचे  संदेश  त्यांनी  सायकलींवरही लावले आहेत.

उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित ‘आझाद हिंद सेने’च्या ७८ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात या सायकलस्वारांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी उपस्थित केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री सर्वश्री अर्जुनराम मेघवाल आणि मिनाक्षी लेखी यांनी ‘नेट झिरो इंडिया’ या अनोख्या उपक्रमाविषयी जाणून घेतले व या उपक्रमाचे कौतूकही केले. यावेळी दिल्लीकरांसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना या सायकलस्वारांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
 
या सायकलस्वारांनी आज ‘कुतुब मिनार’ येथे जावून पर्यावरण संवर्धन विषयक जागरूकता संदेश दिले. परतीच्या प्रवासात त्यांनी  चौकाचौकांमध्ये थांबून जनतेचे पर्यावरण संवर्धनाविषयी  प्रबोधनही केले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी या सायकलस्वारांनी भेट दिली, यावेळी श्री दानवे यांनीही या उपक्रमाचे कौतूक केले. उद्या २३ ऑक्टोबर रोजी  या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

तत्पूर्वी  २ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘नाशिक ते मुंबई’ असा सायकल प्रवास करून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने ‘नेट झिरो इंडिया’ या उपक्रमाची सुरुवात झाली . राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन उपक्रमाविषयी माहिती दिली.  त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्याची माहिती नाशिक  सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत नाईक, किशोर माने आणि सचिव डॉ. मनिषा रौंदळ व खजिनदार राजेंद्र दुसाने यांनी दिली.महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनेही ‘नेट झिरो इंडिया’ या उपक्रमासह नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या भविष्यातील उपक्रमांना शुभेच्छा देण्यात आल्या.