नाशिक हादरलं! अंगावरील दागिने लुटून ६० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या
नाशिक जेलरोड भागात लोखंडे मळा परिसरात घरी एकट्याच असलेल्या महिलेवर हत्याराने वार करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना समोर आली आहे.
नाशिक शहरातील जेल रोड, लोखंडे मळा भागातील हनुमंतनगर येथे ही घटना घडली आहे. सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (वय ६०) असे या घटनेत मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
बेलेकर या लहान मुलगा दीपक व सून दीपाली यांच्यासह राहतात. तर मोठा मुलगा विवेक त्याच भागात पत्नीसह राहतो, दोघेही रविवारी कामावर गेले होते, तर दीपालीच्या भावाचे शुक्रवारी लग्न असल्याने ती माहेरी गेलेली असल्याने सुरेखा बेलेकर घरी एकट्याच होत्या.
याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून हातातील दोन अंगठया व गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेल्याची घटना घडली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या दूधवाल्यास घरातून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने विवेकच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला तसे सांगितले. त्यांनी सासूबाईंकडे धाव घेतली. मात्र, आवाज देऊनही घरातून प्रतिसाद मिळाला नाही.
रविवारची घटना असून बेलेकर या एकट्याच घरात असल्याचा फायदा घेत चोरटयांनी महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्यासाठी केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याच दिवशी रात्री दूधवाला आल्यानंतर त्याने आवाज दिला. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्याने शेजारच्यांना आवाज दिला. त्यांनतर शेजारच्या नागरिकांनी बेलेकर यांच्या जवळच राहणाऱ्या विवेकच्या घरी त्याच्या पत्नीला ही घटना सांगितली. त्यामुळे बेलेकर यांच्या सुनेने तत्काळ सासूच्या घरी जाऊन आवाज देत दरवाजा वाजवला, मात्र घरातून प्रतिसाद मिळाला नाही.
याचवेळी काही जणांनी घराच्या मागे जाऊन पाहिले असता मागील दरवाजा उघडा दिसला. मागील दरवाजातून घरात पाहताच सुरेखा बेलेकर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला होता. घटनेची माहिती मिळताच बेलेकर यांच्या दोन्ही मुलांनी घराकडे धाव घेतली, नातेवाईक व रहिवाशांनी त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले.
जिल्हा रुग्णालय, तसेच फॉरेन्सिक अहवालात या महिलेच्या डोक्यात अवजड वस्तूने सात-आठ वार केल्याचे नमूद असल्याचे समजते. या महिलेचे दागिनेही चोरीस गेले आहेत. त्यामुळे लूटमारीच्या उद्देशानेच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लूटमारीची तिसरी घटना:
हनुमंतनगर येथे काही महिन्यांपूर्वी क्षत्रिय यांच्या घरी सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा चोरट्यांनी दहा तोळ्यांचे दागिने लंपास केले होते. याच भागातील ज्येष्ठ नागरिक पी. एम. जाधव यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून लुटून नेले होते. आता खुनाची घटना घडली असून, अलीकडच्या काळातील ही या भागातील तिसरी लूटमारीची घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची अपेक्षा स्थानिक व्यक्त करीत आहेत.
Edited By - Ratnadeep ranshoor