सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (08:17 IST)

दहावीसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १६ जानेवारी २०२२ ला

इयत्ता दहावीसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १६ जानेवारी २०२२ (रविवार) रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नियमित आवेदनपत्रे १६ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान १५० रूपये शुल्क, ऑनलाइन विलंब आवेदनपत्रे १ ते ७ डिसेंबर या कालावधीत २७५ रूपये शुल्कासह, तर ऑनलाइन अतिविलंब आवेदनपत्र ८ ते १३ डिसेंबर या दरम्यान ४०० रूपये शुल्कासह तसेच ऑनलाइन अतिविलंब आवेदनपत्र भरण्यासाठी शाळा, संस्था जबाबदार असतील तर त्यांनी ५२५ रूपये भरून ८ ते १३ डिसेंबर या दरम्यान भरावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.
 
महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण देशात दहावी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे २००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतात. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या नियमांच्या अधिन राहुन प्रत्येक शिष्यवृत्ती धारकाला इयत्ता ११ वी आणि १२ वी पर्यंत एक हजार २५० रूपये, तर सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत (उदा. बी.ए., बी. कॉम, आणि बी. एससीपर्यंत) दोन हजार रूपये, सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत (पदव्युत्तर पदवीपर्यंत) दोन हजार रूपये तसेच पीएच.डी साठी चार वर्षांपर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते, असे तुकाराम सुपे यांनी सांगितले.
 
अशी असे परीक्षा...
 
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत बौद्धिक क्षमता चाचणी पेपर १०० प्रश्न १०० गुणांसाठी विचारले जातात. कालावधी दोन तास (सकाळी १०.३० ते १२.३०) तसेच पात्रता गुण प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण हवे. तर शालेय क्षमता चाचणी पेपरमध्ये १०० प्रश्न १०० गुणांसाठी विचार ले जातात. यासाठी दोन तासांचा कालावधी (१.३० ते ३.३०) दिला जातो. या पेपरलाही ४० टक्के पात्रता गुण आवश्यक आहे.