'श्रद्धांजलीसाठी चांगला फोटो ठेवा' , असं स्टेटस ठेवून त्याने घेतला अखेरचा निरोप
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे या 22 वर्षीय तरूणाने घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी 'श्रद्धांजलीसाठी चांगला फोटो ठेवा' , असं स्टेटस ठेवून अखेरचा निरोप घेतला.
विशाल उत्तम शिंदे असं या 22 वर्षीय तरूणाचं नाव आहे. विशाल शिंदेने शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या मित्रांना उद्देशून भावनिक पोस्ट स्टेटसला ठेवून आत्महत्या केली. विशालने आपल्या स्टेटसमध्ये मित्रांवर खूप प्रेम असल्याच म्हटलंय. तसेच मी कुणाला दुखावलं असेल तर राग मनावर घेऊ नका. सगळे आनंदाने राहा, असंही विशालने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.
आत्महत्या करण्यापूर्वी विशालने त्याच्या स्टेटसमधून आपल्या मित्रांकडे शेवटची इच्छा व्यक्त केली. 'माझ्या मूत्यूनंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी माझे चांगले फोटो तुमच्या स्टेटसला ठेवा.' त्याची ही पोस्ट वाचून सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. विशालची पोस्ट पाहून सगळ्यांनी त्याला थांबवण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता.