शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (12:59 IST)

‘कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

मलिक यांनी कबूल है म्हणत ट्विट केलं, तर ज्ञानदेव वानखेडेंनी फोटो शेअर करुन केला खुलासा
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. गेल्या महिनाभरापासून नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे यांच्यातील वाद सुरु आहे. 
 
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी अनेकदा मलिकांनी नवनवे पुरावे समोर आणण्याचा प्रयत्नही केला आहे. अशात आता मध्यरात्रीच नवाब मलिकांनी आणखी एक ट्विट केला आहे. मलिकांच्या ट्विटनंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
 
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा मुस्लिम पोशाख घातलेला फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळेचा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यासंदर्भातले काही पुरावेही त्यांनी दिलेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावेळीचा फोटो ट्वीट करत कॅप्शनमध्ये , ‘कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’, असे लिहिले आहे.
 
तर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये समीर वानखेडे हिंदू असल्याचा पुरावा दिला गेला आहे. त्यांनी तीन फोटो शेअर केलेत. ज्यात पहिला फोटो समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या लग्नातला आहे. दुसऱ्या फोटोत समीर वानखेडे सत्यनारायण पूजेच्या नमस्कार करतानाचा आहे. तर तिसऱ्या फोटोत समीर वानखेडे कसली तरी पूजा करत असताना दिसून येत आहेत.
 
ज्ञानदेव वानखेडे यांनी हे फोटो शेअर करुन आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो असं म्हटलं आहे.
 
याआधीही नवाब मलिक यांनी निरनिराळे पुरावे सादर करत वानखेडे मुस्लीम असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.