गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (08:37 IST)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीही स्वबळावर : नवाब मलिक

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असलं तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने सांगत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळू शकतं.
 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक म्हणाले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे काही ठिकाणी कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.