धक्कादायक ! जमीनीच्या वादातून केला सख्ख्या भावाचा खून
जमीनीच्या वादातून सख्ख्या भावाचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे घडली.शिरुरमध्ये घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास घडली.
भाऊ राणू जाधव (वय-60) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रानु जाधव,पुष्पा बाबाजी जाधव व शितल रानु जाधव (सर्व रा.शितोळे वस्ती,कवठे येमाई,ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भाऊ जाधव यांचा मुलगा संतोष भाऊ जाधव याने शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष जाधव याने फिर्यादीत म्हटले की, रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मी आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे उपचारासाठी गेलो होतो. त्यावेळी माझा मित्र सागर मुलमुले याचा फोन आला.त्याने सांगितले की, तुझे चुलते बाबाजी, चुलती पुष्पा व चुलत बहीण शितल हे तुझे वडील भाऊ जाधव यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत आहेत. हे ऐकून मी आमच्या घराजवळ आलो. तेव्हा माझे वडील रोडच्या कडेला पडले होते,असे फीर्यादीत नमूद केले आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भाऊ जाधव यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी भाऊ जाधव यांना तपासून त्यांना मृत घोषित केले.