मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :लाहोर , मंगळवार, 23 जून 2020 (14:59 IST)

विधान परिषदेसाठी आनंद शिंदेंना राष्ट्रवादीची पसंती

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकगायक आनंद शिंदे (Anand Shinde)यांच्यासोबतच एका ज्येष्ठ पत्रकाराला पसंती दिली असल्याचे समजते. आनंद हे दिवंगत लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. ‘जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’या लोकगीताने त्यांनी महाराष्ट्रातील तरूणांना ठेका धरायला लावला होता. आजही त्यांचे हे गीत अतिशय लोकप्रिय आहे.  हाडाचे कलावंत असलेले आनंद शिंदे हे सध्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीसही आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांना यश मिळाले नाही.
 
अखेरीस राज्यपाल नियुक्त कोट्यामधून आपली विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली राजकीय इच्छा व्यक्त केली. सत्ताधारी पक्षांकडून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची नावे दिली जाण्याची शक्यता आहे अशा नावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी फुली मारतील, असे राष्ट्रवादीला वाटत आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन पवार यांनी राजकीय क्षेत्राऐवजी इतर क्षेत्रातील व्यक्तींनाच संधी देण्याचा विचार केला आहे.
 
या पार्श्वभूमीवर आनंद शिंदे(Anand Shinde)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. कोरोनाच्या महामारीमध्ये लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना सरकारने मदत करावी यासाठी पवारांची भेट घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र, या भेटीने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, शिंदे यांनी आपण कलाकारांच्या मदतीसाठी भेटलो असून, विधान परिषदेच्या आमदारकीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.