सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (11:47 IST)

होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीसाठी नवी नियमावली जाहीर

राज्यात मागील दोन वर्षं सतत कोरोनासंसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने बऱ्यापैकी सण आणि उत्सव साजरे करणाऱ्यावर निर्बंध होते. कोरोनासंसर्गाचं प्रमाण आता कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेत. मात्र जग पूर्वपदावर येत असतानाच नवीन व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' काही देशात आढळून आलाय.
 
याच पार्श्वभूमीवर होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
 
होळी आणि धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे गरजेचं आहे. जनतेला हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
 
होळी आणि धुलीवंदनाची नियमावली
1. होळी सणाच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था राखणे अत्यंत जरुरीचे आहे.
 
2. सर्व मंडळांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावं. आदेशाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 
3. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या होळया रात्री 10 वाजेच्याआत लावणे बंधनकारक आहे.
 
4. होळीच्या सणाच्या वेळी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कोणालाही डी. जे. लावण्यास बंदी आहे किंवा सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसंच जर कोणी डी.जे.चा वापर करताना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
 
5. होळी सण साजरा करताना कोणीही मद्यपान करून बिभत्स आणि उद्धट वर्तन करणार नाही.
 
6. होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची आणि मुलींची कोणीही छेड काढणार नाही याबाबत मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं. सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच राहील.
 
7. सध्या 10 वी आणि 12 वीच्या वार्षिक परीक्षा चालू असल्याने होळी सणानिमित्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने लाऊड स्पीकर जोरात वाजवून परीक्षार्थींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
8. महिलांनी परिधान केलेल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
 
9. होळी सणानिमित्ताने कोणत्याही जाती-धर्मांच्या भावना दुखावतील अशा घोषणा देण्यात येऊ नये तसंच आक्षेपार्ह फलक, बॅनर लावण्यात येऊ नये.
 
10. होळीच्या सणानिमित्ताने वृक्ष (झाडे) तोड करू नये. असं करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 
11. होळीच्या सणानिमित्त कोणीही जबरदस्ती रंग, फुगे आणि पाण्याच्या पिशव्या कोणाच्याही अंगावर फेकू नये.
 
12. होळी सणानिमित्त कोणीही मोठी आग लागणार नाही, होळी पेटवताना होळीतील आग वाऱ्याने उडून कोणाच्या घरावर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
13. होळीच्या जवळपास कोणत्याही प्रकारची आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्नी विरोधक यंत्र (Fire Extinguisher) तसंच पाण्याचा साठा तयार ठेवावा.
 
सध्या कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन'चा संसर्ग जगात पसरत आहे. हा व्हेरियंट डेल्टा (AY.4) आणि ओमिक्रॉन (BA.1) या व्हेरियंटचं कॉम्बिनेशन आहे.
 
युरोपातील फ्रान्स, नेदरलॅंड्स, यूके आणि डेन्मार्क या देशांमध्ये 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला हा व्हेरियंट पहिल्यांदा आढळून आला होता.
 
डेल्टाक्रॉनबाबत महाराष्ट्र सरकारही लक्ष ठेऊन आहे. महाराष्ट्राच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे सांगतात, "भारतात सद्यस्थितीत डेल्टाक्रॉन व्हेरियंट आढळून आलेला नाही. जगभरातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन सावधपणे आपणही स्क्रिनिंग करतोय."