शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (08:33 IST)

कुसुमाग्रज यांनी शिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषद शाळेस एक कोटींचा निधी मंजुर

पिंपळगाव बसवंत: मराठी साहित्याची थोरवी सातासमुद्रापार पोहचविणा-या कविवर्य कुसुमाग्रज यांनी शिक्षण घेतलेल्या पिंपळगाव बसवंत जिल्हा परिषद शाळेच्या विकास कामांसाठी निधीची मागणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार दिलीप बनकर यांनी करताच या मागणीची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ दखल घेऊन पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेला एक कोटींचा निधी मंजूर केल्याने शाळेच्या विकासाला बळकटी मिळणार आहे.
 
निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी हे कुसुमाग्रज आर्थत कविवर्य वि. वा शिरवाडकर यांची जन्मभूमी ! कुसुमाग्रज यांचे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण पिंपळगाव बसवंत जिल्हा परिषद शाळेत झाले. या शाळेच्या विकासाला निधी उपलब्ध व्हावा. तसेच मराठी साहित्याची पालखी सातासमुद्रापार पोहचविणा-या कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी दिवस म्हणून राज्यभर साजरा केला जात असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाने पाठवला असल्याचे नमूद करत याकडे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष वेधले असता आमदार दिलीप बनकर यांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळगाव बसवंत जिल्हा परिषद शाळेला एक कोटीच्या निधीला मंजूर केल्याची माहिती दिली.