शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (11:06 IST)

देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांचा कालव्यात बुडून मृत्यू

देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांचा भाटेगाव शिवारात कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निलेश महिंद्रदास देवमुराद असे मयताचे नाव असून प्रशांत नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
 
नागपूर येथून वारंगा मार्गे देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांसोबत ही दुर्देवी  घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथून निलेश देवमुराद, सौरभ तुळशीराम दुसे, नयन गजानन चोथे, अंकीत दामोदर टाले व अन्य एक जण (रा. दिघोरी, नागपूर) कारने वारंगा फाटा मार्गे तुळजापूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते.
 
दुपारी ते वारंगा नजीक भाटेगाव शिवारातील कालव्याजवळ थांबले आणि त्यांनी स्वयंपाक करुन जेवण केलं. नंतर चालक प्रशांत हात धुण्यासाठी कालव्यात गेला असताना कालव्याच्या पाण्यात पडला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली तर त्याला वाचवण्यासाठी निलेश मध्ये पडला. मात्र तो देखील पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. 
 
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. सौरभने त्यांना काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील वाहून जाऊ लागला तेवढ्‍यात परिसरात काम करत असलेल्या काही लोकांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी तातडीने सौरभला बाहेर काढले मात्र निलेश व प्रशांत वाहून गेले. पोलिसांच्या शोधात निलेश याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मात्र प्रशांतचा अद्यापही शोध सुरुच आहे.