शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (08:24 IST)

सना खान हत्याकांडाला नवे वळण

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान हत्याकांडाला नवीन वळण मिळाले असून सना यांचा मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू याच्या आईच्या घरावर छापा मारल्यानंतर पोलिसांच्या हाती नवे पुरावे लागले आहेत. सना यांच्या मोबाईलमधून हत्याकांडाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत पोलिस घेत आहेत.
 
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणा-या अमित साहू याची भाजपाने आयोजित केलेल्या एका शिबिरात सना खान यांच्याशी ओळख झाली होती. त्या कार्यक्रमात सना खान यांची मोठमोठ्या नेत्यांशी ओळख असल्याचे अमितच्या लक्षात आले. भाजपकडून आमदारकीचे तिकिट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमित साहूने सना खान यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी लग्न करून अमितने राजकीय वलय निर्माण केले होते.
 
यादरम्यान, अमितने सना यांच्या काही अश्लील चित्रफिती तयार करून ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू केली होती. ऑगस्ट महिन्यात अमित साहूने पैशांच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या केली होती व त्यानंतर सहका-यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह हिरन नदीत फेकला होता. पोलिसांनी जवळपास तीन महिने शोधमोहीम राबवली, मात्र सना खान यांचा मृतदेह शेवटपर्यंत सापडला नाही. आरोपींनी सना खान यांचा मोबाईलदेखील नदीत फेकल्याचा दावा केला होता. पोलिसांना मोबाईलदेखील आढळला नव्हता.
 
दरम्यान, अमित साहूला दुस-या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच त्याने जबलपूरमध्ये राहणा-या आईच्या घरी मोबाईल आणि लॅपटॉप असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी अमितच्या आईच्या घरी छापा टाकला. या छाप्यात सना यांचा मोबाईल व लॅपटॉप आढळला आहे. हा मोबाईल व लॅपटॉप अमितने तेथे नेऊन ठेवला होता. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईलमधील माहिती पुरावा म्हणून काढण्यात येणार आहे.