शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (20:33 IST)

नितेश राणेंची तब्येत बिघडली, उपचारांसाठी सिंधुदुर्गातून कोल्हापूरला हलवलं

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक वेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पण राणे यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर इथं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज (7 फेब्रुवारी) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
 
दरम्यान, नितेश राणे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे छत्रपती प्रमिला राजे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग इथं शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्याच दिवसापासून त्यांच्या छातीत दुखू लागले होते.
 
ओरस शासकीय रुग्णालयात ह्रदयरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेतला होता. पण साखर कमी झाल्याने तसेच मणक्याचा त्रास यामुळे त्यांना तातडीने हलवण्यात आले नव्हते. पण आज संध्याकाळी साडे चार वाजता नितेश राणे यांना कोल्हापूर इथं आणण्यात आले. यावेळी रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळं रुग्णालय आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
 
आमदार नितेश राणे यांच्यावर तज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करणार असल्याची माहिती सीपीआरचे वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी ही माहिती दिली. राणे यांच्या रक्ततपासणीसोबत MRI सारख्या तपासण्या केल्या जातील. यासाठी राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
 
संतोष परब हल्ला प्रकरण नेमकं काय आहे?
संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख होते.
 
18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.
 
एका गाडीनं आपल्याला आधी धडक मारली, त्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोराने नितेश राणेंना कळवायला पाहिजे, असा उल्लेख केल्याचं संतोष परब यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
 
याप्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह चार जणांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांचीही पोलीसांनी चौकशी केली. पण नितेश यांनी आपल्यावरचे आरोप साफ नाकारले तसंच अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्गातील जिल्हा न्यायालय, उच्च न्यायलय आणि सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण सर्वत्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

याविषयी सिंधुदुर्गातले ज्येष्ठ पत्रकार सांगतात की "आदित्य ठाकरेंचं वाढतं महत्त्व हा मुद्दा आहेच, पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ही निवडणूकही प्रतिष्ठेची बनली होती. इथे राणेंच्या भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्रित उभी होती.
 
या निवडणुकीचे पडसाद सिंधुदुर्गातल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही उमटू शकतात याची सर्व पक्षांना कल्पना आहे. शिवसेना हा राणेंसाठी टीआरपी आहे आणि राणे हा शिवसेनेसाठी टीआरपी आहे. कोकणात वर्चस्व दाखवायचं असेल, तर एकमेकांविरोधात प्रखरपणे उभं राहणं दोघांसाठीही गरजेचं आहे."