रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (14:33 IST)

नितेश राणेंचा युवा सेनेवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टानं 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेबरला रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे हजारी लावण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी माध्यमांना दिली आहे.
 
तसंच नारायण राणे यांना भविष्यात असं वक्तव्य न करण्याची ताकीद कोर्टानं दिली आहे. शिवाय पोलिसांना जेव्हा पाहिजे तेव्हा आवाजाचे नमुने उपलब्ध करून देण्याचे आदेश कोर्टानं राणेंना दिले आहेत.
 
साक्षीदारांवर दबाव न आणणं तसंच पुराव्यांशी छेडछाड न करण्याची सूचनादेखील कोर्टानं राणेंना केली आहे. रात्री उशीरा राणे यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
 
पोलिसांनी राणेंच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. तर राणेंच्या वकिलांनी मात्र त्याला विरोध केला होता. राणेंना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला.
 
दरम्यान, या पत्रकार परिषदेआधीच राणे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केलं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं, तसंच युवा सेनेच्या कालच्या आंदोलनाविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलं.
 
नारायण राणे यांच्या निवासस्थानाबाहेर मंगळवारी युवा सेनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीचा फोटो नितेश राणे यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
 
त्यांनी म्हटलं आहे, "पश्चिम बंगालप्रमाणे मंगळवारी झालेली हिंसा ही राज्य सरकार पुरस्कृत होती. मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता निश्चित करणं अपेक्षित आहे पण ते तर गुंडाचा सत्कार करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात या ठगापासून सुरक्षित राहण्यासाठी राष्ट्रपती राजवट आवश्यक आहे."
 
दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भातला एक फोटो पोस्ट केला आहे. वाघ कोंबडीची शिकार करत असतानाचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे.