किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करा, आमदार सरनाईकांची मागणी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी पदाचा दुरुपयोग करून पत्नीच्या संस्थेस शौचालय बांधणीचे कंत्राट मिळवून दिले आहे. तसेच कांदळवन आणि सीआरझेडमध्ये अनधिकृत बांधकामे केल्याने पर्यावरणाचा -हास झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात युवक प्रतिष्ठानच्या वतीने 16 ठिकाणी शौचालयांचे बांधकाम करण्याचे कंत्राट घेतले होते. या कामापोटी 4 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम सदर ठेकेदार संस्थेने घेतली आहे. कोणत्याही रितसर परवानग्या न घेता कांदळवन, सीआरझेड आणि खाडी पात्रात शौचालयांची अनधिकृत बांधकामे करून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. तसेच त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून महापालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून कोट्यवधीची बिले घेतली आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान आपण याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांनी मीरा भाईंदर महापालिका आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. महापालिका आयुक्तांनी 18 मार्च 2001 रोजी शासनाकडे जो अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार 16 ठिकाणी युवक प्रतिष्ठानने कांदळवन तसेच सी.आर.झेड क्षेत्रात शौचालयांची बांधकामे केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे आपण दिलेली तक्रार खरी असल्याचे सिद्ध झाल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या व मेधा सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती लेखी पत्राद्वारे केल्याचे सरनाईक म्हणाले.