शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (08:02 IST)

पुन्हा एकदा मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज

येत्या दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे. त्यासोबतच विदर्भातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवार ९ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान हा पाऊस आणि गारपीटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. या कालावधीत काही जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
शनिवार ते रविवार या कालावधीत राज्यात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी उकाड्याचा पारा चढलेला असतानाच या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी उकाड्यापासून काही कालावधीसाठी दिलासा मिळणार आहे.