बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (08:24 IST)

केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा संताप आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या कामाकडे दुर्लक्ष केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार आज पहिल्यांदाच कोल्हापुरात पाहायला मिळाला आहे. कोरोना काळात रुग्णांच्या झालेल्या हेळसांड मुद्यावरून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोल्हापुरातील आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना झापलं आहे.
कोरोना काळात इतर आजार असणाऱ्या रुग्णांची हेळसांड झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता याची तक्रार भाजपाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद गुरव यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली. या तक्रारीवरून जिल्हाशल्य चिकित्सक यांच्याकडून आलेल्या हर्षल वेदक, सीपीआर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज चे डीन प्रदीप दीक्षित आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याच्या मुद्द्यावरून या तीनही अधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मंत्री पवार यांनी खरडपट्टी केली आहे.
रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी सहन करणार नाही अशा शब्दात भारती पवार यांनी कोल्हापूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सुनावले. केंद्राकडून येणाऱ्या निधी हा आरोग्य विभागासाठीच शंभर टक्के खर्च झाला पाहिजे अशीही त्यांनी तंबी दिली.
दरम्यान कोरोना काळात सीपीआर हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी ठेवले गेले होते. या दरम्यान कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांची मोठी हेळसांड झाली आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अनेक रुग्ण दगावले यामुळे भारती पवार यांनी या तीनही अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कामाकडे दुर्लक्ष केल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासमोरच मंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना झापले.