शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (15:59 IST)

लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको, संजय राऊत

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. लतादीदींच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजप नेते राम कदम यांनी स्मारक बांधण्याची मागणी केली आहे. भाजपच्या मागणीवर आता राजकारण होत असल्याचे दिसत आहे. लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण करण्यात येऊ नये असा पलटवार शिवसेना खा. संजय राऊत यांनी केला आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्मारक बांधण्याची मागणी केली आहे.
 
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राम कदम यांच्या मागणीवर पलटवार केला आहे. कदम यांनी लतादीदींचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता. राऊत म्हणाले की, काही लोकांनी मागणी केली आहे. परंतु त्यांना मागणी करण्याची गरज नाही. लतादीदींचे स्मारक हे राजकारण करु नका, लतादीदी आपल्यात आहेत असे संजय राऊत म्हणाले.
 
लतादीदी या देशाच्या आणि जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक नक्की महाराष्ट्राचे आणि देशाचे सरकार करेल, कारण त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या तो आपला अनमोल ठेवा होता. लतादीदींचे स्मारक बांधण्याची मागणी होत आहे. त्यांना मागणी करु द्या परंतु लतादीदींचे स्मारक बनवणे इतके सोपे नाही. त्या कोणी राजकीय व्यक्ती नव्हत्या त्या स्वतः मोठ्या व्यक्ती होत्या. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार केला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.