1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (15:16 IST)

आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो : संजय राऊत

परमबीर सिंग  हे स्वत: आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीपासून अपहरणापर्यंतचे अनेक गुन्हे आहेत. कदाचित मनसुख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले माहीत नाही. पण आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो. आतापर्यंत हे प्रकार झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने कितीही आरोप केले आणि त्याचं कितीही भांडवल केलं तरी त्याचा उपयोग नाही, त्यांना आरोप करत राहू द्या, असा पलटवार शिवसेना नेते संजय राऊत  यांनी केला आहे. सचिन वाझेला सेवेत प्रतिनियुक्तीवर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव आणला होता, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
 
शिवसेना नेते संजय राऊत हे मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. आरोपी स्वत:ला वाचवण्यासाठी कुणाचेही नाव घेत असतो. आम्हीही अनेकदा पंतप्रधानांचे नाव घेत असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतलं जात होतं, असं संजय राऊत म्हणाले.