सत्तेवर असताना विदर्भासाठी काही केले नाही,उद्धवजी आता नागपुरात येऊन काय करणार ?
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
उद्धवजी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे विदर्भासाठी काही केले नाही, नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे आयोजन केले नाही, तुमचा काळ संपला, आता नागपूरला येऊन काय करणार, असा खणखणीत सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.
भाजपा प्रदेश पदाधिकारी व जिल्ह्याध्यक्षांच्या एक दिवसाच्या बैठकीचे सोमवारी नागपूर येथे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आणि प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते.
मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीला विदर्भात तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशन आयोजित केले नाही, विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन केले नाही, सत्तेवर असताना त्यांनी विदर्भाच्या विकासाबाबत बेईमानी केली. महाविकास आघाडीला विदर्भ आणि मराठवाडा माफ करणार नाही. उद्धवजी सत्तेवर असताना अडीच वर्षे विदर्भात का आला नाहीत ? आता तुमचा काळ गेला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काळ आला.
त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलताना आधी आपण सत्तेवर असताना काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याचे घोर विरोधी आहात. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही म्हणून भावनिक मुद्दे मांडून संभ्रम निर्माण करत आहे.
ते म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले आणि परिवर्तन झाले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने काम करणार आहे. आजच्या दिवसभराच्या बैठकीत या विषयावर आणि संघटनात्मक बळकटीवर चर्चा करण्यात येत आहे. २०२४ साली निवडणुकीला सामोरे जाताना जनसामान्यांशी संपर्क साधून पक्ष संघटना बळकट करत आहोत. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा राज्यात ताकदीने उभी राहील यासाठीची योजना अंमलात आणत आहोत.
Edited by : Ratnadeep Ranshoor