मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2023 (09:02 IST)

गुन्हेगारी विश्वात खळबळ; कुख्यात गुंड बाळा वाघेरेला पोलिसांकडून बेड्या

arrest
पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पैशाच्या व्यवहारातून बाळा वाघेरे आणि त्याच्या साथीदारांनी एकाचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी वाघेरेला त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे.
 
 
एका व्यावसायिकाला मारहाण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बाळा वाघेरेसह त्याच्या दोन्ही साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, या व्यापाऱ्याची वाल्हेकरवाडी येथील वाघेरेचा साथिदार हरीश चौधरीसोबत आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र ते पैसे व्यापाऱ्याने परत केले तरी चौधरी आणखी पैसे मागत होता. ते देण्यास व्यापाऱ्याने नकार दिला. म्हणून त्याचं अपहरण करून त्याला बाळा वाघरेच्या घरी आणलं गेलं. त्याला मारहाण करण्यात आली. बाळा आप्पा वाघेरे, हरीश चौधरी आणि राहून उणे या तिघांनी त्या व्यावसायिकाला मारहाण केली.
 
त्यानंतर पैसे आणून देतो म्हणून व्यापाऱ्याने तिथून कशीबशी सुटका करून घेतली. बाहेर निघताच थेट चिंचवड पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन वाघेरेला काही कळण्याआधी त्याच्या घरातून त्याला बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर अन्य दोन आरोपी, हरीश चौधरी, राहून उणे यांना देखील पोलिसांनी अटक करुन गजाआड केले आहे. बाळा वाघेरेवर या आधी अपहरण, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
 
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अनेक टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे दहशतदेखील निर्माण झाली आहे आणि नागरिकांना धास्ती बसली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अनेकदा गँगवार पाहायला मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून कोयता गँग भर रस्त्यात दहशत माजवत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनांमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. अशात या कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी विश्वात काहीप्रमाणात चाप बसू शकते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor