शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:43 IST)

आता सुरु झाले राणे-नार्वेकर ‘ट्विटर वॉर’!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली होती. विशेष म्हणजे त्याच प्रकरणावरुन राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ट्विटरवर इशारा दिला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शिवसेना सचिव मलिंद नार्वेकरांच्या फोनवरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा कॉल केला होता, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. पण नारायण राणे यांनी त्यापलीकडे फारसं काही बोलण्यास टाळलं आहे. तसेच त्यांनी नार्वेकरांना उद्देशून शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.
 
 राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांचा ‘मातोश्री’मधील ‘बॉय’ असा उल्लेख केला होता. तसेच कोण मिलिंद नार्वेकर? असा सवाल करत खिल्ली उडवली होती. त्यांच्या या टीकेला मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर उत्तर दिलं होतं. स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? असा खोचक सवाल नार्वेकरांनी केला होता. त्यांच्या या सवालावर नारायण राणेंनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं आहे.
 
सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
 
मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नारायण राणे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?”, असा सवाल करत नार्वेकरांनीदेखील नारायण राणे यांना टोला लगावला आहे.