पंकजा मुंडे यांच्या विधानावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक विधान केले असून या विधानाची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. “मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचा असेल पण ते मला संपवू शकत नाहीत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. याविषयी आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरावडा निमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांचीही विशेष उपस्थिती होती. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे पण मला कोणी संपवू शकतं नाही.”