बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली
बच्चू कडू त्यांच्या आक्रमक कामाच्या पद्धतीसाठी ते लोकांमध्येही चर्चेचा विषय ठरतात. मात्र, त्यांच्या याच पद्धतीमुळे ते अनेकदा वादातही सापडले आहेत. असाच एक प्रकार अमरावतीतील जिल्ह्यात घडला आहे. अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र, तेथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
गणोजातील रस्त्याच्या कामावर एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतले होते. बच्चू कडू या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना या कार्यकर्त्याने हे आक्षेप बच्चू कडूंसमोरही मांडले. त्यावेळी बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, तर कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता.
रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या कार्यकर्त्याने केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि तू मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं.