बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (09:15 IST)

‘मातोश्री’चे कुत्रे फिरवणारी व्यक्ती असा उल्लेख करत उद्धव ठाकरे गटातून थापा यांच्यावर टीका

बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सावलीसारखं त्यांच्यासोबत राहिलेल्या चंपासिंह थापा यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटातून थापा यांच्यावर टीका केली जातेय. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी थापा यांना ‘मातोश्री’चे कुत्रे फिरवणारी व्यक्ती असा उल्लेख केला आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे.
 
जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळमधून आलेल्या थापा यांनी बाळासाहेबांची शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. अशा व्यक्तीचं कुत्रं फिरवणारा माणूस असा उल्लेख करणं, अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या अडीच वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या, दरम्यान थापा मला भेटले होते. राज्यात सत्तेसाठी तडजोड करण्याचं जे काम सुरू आहे, ते थापा यांना आवडलं नव्हतं. ते नाराज होते. याच पार्श्वभूमीवर ते आज मला भेटायला आले. तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहात. आमचं नेपाळदेखील हिंदूराष्ट्र आहे. त्यामुळे मी बाळासाहेब ठाकरेंसोबत मागील अनेक वर्षांपासून मनापासून काम केलं. मी तुमच्यासोबत काम करायला इच्छुक आहे, असं म्हणत थापा यांनी माझ्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.