मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (16:01 IST)

“आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज वाढदिवशी शुभेच्छा देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोमणा मारला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना तितक्याच खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. “आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे”, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. 
 
“आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.