रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बारामती , बुधवार, 2 मे 2018 (16:43 IST)

महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी पाटील यांची निवड

महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पी. एस. पाटील यांची पदोन्नतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. महावितरणचे व्यवस्थापन आणि प्रसारमाध्यमे, ग्राहक व इतर घटकांमध्ये उत्तम समन्वय साधून काम करणारे तसेच दांडगा जनसंपर्क असणारे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. या पूर्वी ते सहमुख्य जनसंपर्क अधिकारी-१ या पदावर कार्यरत होते.
 
१९९२ साली सरळ सेवेतून त्यांची तत्कालीन महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतर उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी-१ या पदांसह  शिष्टाचार अधिकारी या पदाची धुरा त्यांनी मागील अनेक वर्षापासून यशस्वीरित्या सांभाळली आहे. पी.एस. पाटील यांच्या नेतृत्वात महावितरणच्या जनसंपर्क विभागाने अधिक भरीव कामगिरी करत जनसंपर्क विभागाला नवे आयाम मिळवून दिले आहे. पी.एस. पाटील यांच्या कामातील तत्परता, मनमिळावू स्वभाववृत्तीमुळे जनसंपर्क विभाग यशस्वी कामगिरी करीत असून त्यातून उत्तम समन्वय, चांगली प्रतिमा निर्मिती व ग्राहकांचा पाठिंबा मिळविण्यात, प्रभावी जनमत घडवून ग्राहक जागृती करण्यात महावितरणला यश मिळाले आहे. पाटील यांच्या या प्रभावी कामाची दखल घेत महावितरण व्यवस्थापनाने पदोन्नतीने त्यांची मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड केली आहे.
 
पी.एस. पाटील हे मुळचे पिशवी (ता. शाहुवाडी, जि कोल्हापूर) येथील रहिवाशी असून महावितरणमध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर येथून दैनिक पुढारीसाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि विविध सामाजिक संस्थेत ते सक्रियपणे कार्यरत आहेत. राज्याच्या सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची प्रेरणा व आदर्श यामुळेच आपण या पदापर्यन्त पोहचलो असे पी.एस. पाटील यांचे कृतज्ञतापूर्वक म्हणणे आहे. पी.एस. पाटील यांच्यापूर्वी या पदावर राम दोतोंडे कार्यरत होते.