रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (21:34 IST)

पालघर :फोर्टिफिकेशन न केलेला खाद्यतेलाचा "इतक्या" लाखांचा साठा सील

edible oil
पालघर : दिवाळी सणाच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत केलेल्या कारवाईत मनोर वाडा रस्त्यावरील टेन गावच्या हद्दीतील राज ऑइल मिल मधील फोर्टिफिकेशन न केलेला खाद्य तेलाचा मोठा साठा सील करण्यात आला आहे. तेलाच्या डब्यावर दिलेल्या माहितीनुसार फोर्टिफिकेशन न केल्याने कारवाई करण्यात आली आहे.
 
कारवाईत 27 हजार 985 किलो खाद्य तेलाचा 91 लाख 43 हजार 940 रुपये किंमतीचा साठा सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  सील केलेल्या खाद्यतेलाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
 
अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभागाच्या सह आयुक्तांच्या निर्देशानुसार दिवाळी सणाच्या तोंडावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त दत्ता साळुंखे आणि अन्न निरीक्षक अभिनंदन रणदिवे यांनी पालघर जिल्ह्यातील आस्थापनांची तपासणी केली.

कोकण विभागाच्या सह आयुक्तांच्या निर्देशानुसार मनोर वाडा रस्त्यावरील टेन गावातील राज ऑइल मिल्स मधील खाद्यतेलाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. यावेळी कंपनी मध्ये एक लीटर क्षमतेच्या तेलाच्या डब्यांमध्ये फोर्टिफिकेशन न करता खाद्यतेल साठवणूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. खाद्य तेलात फोर्टिफिकेशन करण्यासाठी व्हिटॅमिन ए आणि डी मिसळले जात असल्याची माहिती तेलाच्या डब्यावरील स्टिकर मध्ये छापण्यात आली असताना प्रत्यक्ष फोर्टिफिकेशन केले जात नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळून आले.
 
 ही कारवाई अन्न औषध प्रशासनाचे कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पालघर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त साळुंखे यांच्या निर्देशानुसार अन्न निरीक्षण अधिकारी अभिनंदन रणदिवे यांच्या पथकाने केली आहे.
 
दिवाळी सणाच्या निमित्ताने विशेष मोहीम राबविण्यात आली होती. राज ऑइल मिल मध्ये तपासणी केलेला खाद्य तेलाचा साठ्यात डब्याच्या स्टिकर मधील माहिती नुसार फोर्टिफिकेशन केलेले आढळून आले नाही. खाद्य तेलात व्हिटॅमिन ए आणि डी मिसळले जात नसल्याने खाद्यतेलाचा साठा सील करून नमुने तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. खाद्यतेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या कलम 23,24,26 आणि 27 नुसार साठा सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
 
प्रयोगशाळेच्या अहवालात खाद्य तेलाचा दर्जा सुमार आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,किंवा नमुन्यातील खाद्य तेल खाण्यासाठी असुरक्षित आढळल्यास कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त दत्ता साळुंखे यांनी दिली. याबाबत राज ऑइल मिल्स कंपनी व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असता त्यांनी अशा प्रकारची कारवाई झाली नसल्याचे सांगितले.

गिनी ब्रँड फिल्टर ग्राऊंड नट ऑईल 12 हजार 264.98 किलो, किंमत 57 लाख 17 हजार 880
गिनी ब्रँड रिफाईन्ड ऑईल एक लीटर क्षमता तीन हजार 721.07 किलो, किंमत 10 लाख 13 हजार 600
गिनी ब्रँड रिफाईन्ड रईस ब्रान एक लीटर गिनी 5073.25 किलो, 10 लाख 43 हजार 500
गिनी रिफाईन्ड सनफ्लॉवर ऑईल एक लीटर 6926.01 किलो, किंमत 1368960
सील केलेला खाद्य तेलाचा साठा 27985.94 किलो
खाद्य तेलाची किंमत 91 लाख 43 हजार 940 रुपये





Edited By - Ratnadeep Ranshoor