शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:39 IST)

पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये निर्मळवारी अभियान

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी वारीच्या निमित्ताने येर्णा्या लाखो वारकरी भाविकांची सेवा करणाऱ्या निर्मळवारी अभियानातून प्रेरणा घेऊन यंदा वनवासी कल्याण आश्रमाने ‘त्र्यंबकेश्वर निर्मळवारी अभियान २०१८’ हा सामाजिक प्रकल्प हाती घेतला आहे. पौष महिन्यात म्हणजे १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची सेवा आणि स्वच्छता प्रबोधनाव्दारे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. त्यादृष्टीने यंदा त्र्यंबकेश्वर येथे पंढरपूरच्या धर्तीवर निर्मळवारी अभियान राबविले जाणार आहे.

पौष महिन्यातील एकादशीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठी यात्रा भरते. संतश्रेष्ठांच्या दर्शनासाठी राज्याच्या काना कोपऱ्यातून लाखो भाविक येथे उपस्थित होतात. या अफाट जनसंख्येचे नियोजन करताना प्रशासन आणि नागरी आरोग्यासमोर या निमित्ताने निर्माण होणारा मैला आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आ वासून उभा राहत असल्याची वस्तूस्थिती आहे. प्रशासनाच्या स्तरावरून या व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले जात आहेत तरीही या प्रयत्नांना जनतेची मिळणारी साथही तितकीच गरजेची आहे , हे लक्षात घेऊन वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी ६५ वर्षांपासून कार्यरत वनवासी कल्याण आश्रमाने निर्मळवारी अभियान यंदा त्र्यंबकेश्वरच्या यात्रेत राबविण्याचा संकल्प सोडला आहे.

पंढरपूर यात्रेदरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील ४० स्वयंसेवकांनी यवत येथील निर्मळवारी अभियानाच्या प्रकल्पास भेट देऊन यापासून प्रेरणा घेत त्र्यंबकेश्वरमध्ये हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे. यवत येथील प्रकल्पाचा त्यांनी सखोल अभ्यास केल्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे १३ पेक्षाही अधिक ठिकाणी सर्वेक्षण करून जनता आणि प्रशासनाशी समन्वय साधत यासाठी रचना तयार केली आहे. या कार्यामध्ये २८०० स्वयंसेवक योगदान देणार असून त्यांचे यासाठीही प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. या उपक्रमात सरकारी यंत्रणेचीही मदत घेतली जाणार आहे.   

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी यात्रा परिसराच्या भौगोलिक पाहणीसह स्वच्छतागृहांची संभाव्य रचना, त्यांचे तात्पुरते स्वरूप , पाण्याची व्यवस्था , मैल्याचे व्यवस्थापन , शौचालये वापरण्यासाठी केले जाणारे जनप्रबोधन , भाविकांच्या मुक्कामांच्या संभाव्य ठिकाणी शौचालयांची रचना , लाईटची व्यवस्था आदी मुद्दे विचारात घेऊन निर्मळवारीत तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. स्वयंसेवक , स्थानिक प्रशासन , जिल्हाधिकारी कार्यालय , ग्रामस्थ आदी आयामांचा समन्वय साधून भाविकांच्या सेवेसाठी हा वनवासी कल्याण आश्रमाचा महत्वाकांक्षी प्रकल्प भाविकांच्या सेवेत यंदा सादर होणार आहे.

गेल्या १७ वर्षांपासून आश्रमाच्या वतीने या वारीतील भाविकांना औषध पुरविण्यासह सेवाकार्यावर भर देण्यात येतो. या वारीमध्ये सुमारे २ ते ३ लाख भाविकांचा समावेश असणार आहे.

स्वच्छ भारत हा निरोगी भारत व्हावा ह्या हेतूने समाजातील सर्व नागरिकांनी ह्यात सहभागी व्हावे असे आवाहन वनवासी कल्याण आश्रमाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. भरत केळकर ह्यांनी केले.