1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:41 IST)

मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

Pankaja Munde remained silent on the discussions as he was upset over not being given a place in the cabinet Maharashtra News Regional Marathi News
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती.दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
 
दुपारपर्यंत संभाव्य नेते असं सुरु अभिनंदन करणं योग्य नव्हतं असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. “आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचं कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

“मी भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी बोलले होते. त्यांना आदल्या दिवशी मेसेज आल्याने ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्याने त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी पंकजा मुंडेंनी ट्वीट केलं म्हणून प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद गेलं असं म्हटलं असून हे हास्यास्पद आहे,” असंही यावेळी त्या म्हणाल्या. रात्री १२.३० वाजता भागवत कराड यांचा फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो आहे अशी माहिती त्यांनी दिली होती असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. माझे लोकांशी नातं आहे, संबंध नाही. नातं कधीच तुटत नाही पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचं प्रेम असल्याने ते व्यक्त होत असतात असं यावेळी त्या म्हणाल्या.