गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:36 IST)

खडसेंच्या अडचणी वाढणार? जावयाच्या अटकेनंतर आता पत्नीलाही ईडीची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील जमीन घोटाळा,आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जावयाला अटक करण्यात आल्यानंतर आता ईडीकडून आता एकनाथ खडसेंच्या पत्नीला समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी गुरुवारी एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यात आली. सलग नऊ तास एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली.


जावयाला अटक

‘ईडी’च्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी कि मतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू के ला. ईडीने याबाबत गिरीश यांच्याकडे मंगळवारी कसून चौकशी केली. मात्र ते चौकशीस सहकार्य करत नसल्याचे सांगून ‘ईडी’ने त्यांना अटक केली.
 

कोलकात्यातील कंपन्यांच्या पैशातून जमीन खरेदीने खडसे अडचणीत

पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुबियांच्या बँक खात्यात ‘बेंचमार्क बिल्डकॉन‘ कंपनीकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वळते करण्यात आल्याने ते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. खडसे यांच्याविरोधात ईडीने बोगस कंपन्यांमार्फत पत्नी व जावयाच्या बँक खात्यात पैसे दिल्याच्या मुद्द्यावर चौकशी सुरु केली आहे. कोलकत्ता नोंदणीकृत अब्जयोनी, केमेक्स गुड्स, पर्ल डिलर्स, प्रोफिशियंट मर्कटाईज कंपन्यांमार्फत २० ते २६ एप्रिल २०१६ दरम्यान बेंचमार्क बिल्डकॉनच्या बँक खात्यात मोठ्या रकमा जमा झाल्या आणि प्रत्येकी दोन कोटी रुपयांची रक्कम जावई व पत्नीच्या बँक खात्यात वळती करण्यात आली. त्यातून जमीनमालकांना तीन कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले. तर एक कोटी ७८ लाख रुपये मुद्रांक व नोंदणी शुल्क भरण्यात आली.

या खरेदीशी आपला काही संबंध नाही, असा खडसे यांचा दावा असला तरी त्यांच्या बँक खात्यातून पत्नीच्या नावे ५० लाख रुपये पाठविण्यात आले आणि नोंदणीशुल्क भरले गेल्याचे तारखांच्या नोंदीवरुन दिसून येत असल्याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
 
बोगस कंपन्यांमार्फत चार कोटी रुपये मिळाले असले, तरी हे कर्ज असल्याचा दावा शिरीष चौधरी व मंदाकिनी खडसे यांनी चौकशीदरम्यान केला आहे. मात्र बेंचमार्क कंपनीचे मूळ भागभांडवल ४७ लाख ९४ हजार रुपये व सुमारे ५३ लाख रुपयांचे उत्पन्न असताना ११ कोटी रुपये उभारले गेले आणि त्यातून चार कोटी रुपयांचे कर्ज कसे दिले गेले, हा मुद्दा ईडीच्या चौकशीत उपस्थित करण्यात आला आहे. कर्जााच्या रकमेची परतफेड दोन वर्षात झालेली नाही आणि कर्र्ज करारही केला नसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात आपला जबाबही काही महिन्यांपूर्वी नोंदविण्यात आला आहे, असे दमानिया यांनी ‘लोकसत्ता ‘ ला सांगितले.
 

व्यवहार कसा?

चौधरी आणि खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्या नावे एमआयडीसीच्या भोसरीतील जमिनीची खरेदी करण्यात आली होती. ही जमीन अब्बास उकानी यांच्या मालकीची होती ती एमआयडीसीने संपादित करुनही त्याची भरपाई मात्र देण्यात आली नव्हती. खडसे यांनी महसूलमंत्रीपदाच्या काळात एप्रिल २०१६ च्या कालावधीत या जमीनखरेदीची सूत्रे हालविली. महसूल, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यामुळे मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया आणि हेमंत गावंडे यांनी न्यायालयात आणि एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर न्या. र्झोंटग यांनी चौकशी केल्यानंतर फडणवीस सरकारने निर्दोष ठरवले होते. हे प्रकरण बंद करण्यासाठी पुणे येथील विशेष न्यायालयात अर्ज सादर केला आहे. मात्र सुनावण्या झाल्यावर तीन वेळा न्यायाधीशांच्या बदल्या झाल्याने हे प्रकरण प्रलंबित आहे.
 

नऊ तास चौकशी

ईडीने खडसे यांची गुरुवारी नऊ तास चौकशी केली. सकाळी ११ च्या सुमारास खडसे ईडी कार्यालयात हजर झाले. रात्री आठच्या सुमारास ते या कार्यालयातून निघाले. आवश्यकता भासल्यास पुन्हा बोलवू,असे ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. भोसरी येथील भुखंडखरेदीबाबत खडसे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या व्यवहारात त्यांची भुमिका काय होती, हे ईडीने समजावून घेण्याचा प्रयत्न केला.चौकशीदरम्यान ईडीला अपेक्षित असलेली कागदपत्रे समोर ठेवली, अशी माहिती खडसे यांचे वकील अ‍ॅड. मोहन टेकावडे यांनी माध्यमांना दिली.