शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2024 (09:41 IST)

भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा निघाला फोटोग्राफर

chagan bhujbal
नाशिकमधील  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मवर  ड्रोन फिरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता ड्रोन नक्की कोणी फिरवला याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
 
या घटनेमध्ये आता भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा एक फोटोग्राफर असल्याची माहिती समोर येत आहे. विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित पवन राजेश सोनी (29, रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हा फोटोग्राफर असून, त्याने दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भुजबळ फार्म परिसरात कुठलीही परवानगी न घेता ड्रोन उडविला होता, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे  यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
 
याआधी शुक्रवारी  रात्रीच्या सुमारास भुजबळ फार्मवर ड्रोन उडविण्यात आला होता. छगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याबाबत भुजबळ फार्मवरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी नंतर अंबड पोलिसांकडून भुजबळ फार्मची पाहणी करून भुजबळ फार्मबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Edited by -Ratnadeep Ranshoor