1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (13:46 IST)

खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा जीव

pregnant
पहिले बाळंतपण माहेरी व्हावी अशी आईवडिलांची इच्छा होती म्हणून काही दिवसांपूर्वी हिंगोलीवरून ती आपल्या गावी आली. रविवारी रात्री तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या म्हणून गाव पालक तिला घेऊन ऑटोरिक्षातून रुग्णालयाच्या दिशेने निघाले. पण खड्ड्यांमुळे त्रास वाढला आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ऑटोतच तिची प्रसूती झाली. वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा वाटेतच जीव गेला.
 
ही संतापजनक घटना उमरखेड तालुक्यातील टोकावरच्या ढाणकी-बिटरगाव रस्त्यावर रविवारी रात्री घडली. नताशा ढोके (वय ३०) रा. मन्याळी, असे खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या आईचे नाव आहे. नताशाचा विवाह हिंगोलीतील अविनाश ढोके यांच्यासोबत झाला होता. प्रसूतीसाठी ती माहेरी मन्याळीला आली होती. नताशा यांना रात्री प्रसूतीकळा सुरू होताच कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला परंतु जवळपास कुठेही संपर्क होत नसल्याने गावातील ऑटोमधून नताशाला घेऊन ढाणकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. बिटरगाव-ढाणकी रस्त्याने जात असताना खड्ड्यांमुळे नताशाचा त्रास अधिक वाढला आणि ढाणकी दोन किलोमीटरवर असताना ऑटोतच नताशाची प्रसूती झाली. पण वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतीण दोघेही दगावले. खराब रस्त्यामुळे बाळ-बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने समाजमन संतप्त झाले आहे.