1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (08:35 IST)

बेळगाव शहरवासियांना भेडसावतेय पाणी समस्या : दोन दिवस शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय

water
बेळगावच्या हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे दोन दिवस शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. अशातच हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद झाला. परिणामी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दुरुस्ती आणि वळीव पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा नियोजनाचे वेळापत्रक कोलमडले आहे.
 
पाणीपुरवठा वेळापत्रक गेल्या सहा महिन्यांपासून कोलमडले असून, याचा फटका शहरवासियांना बसत आहे. कधी जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तर कधी विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद केला जातो. अशातच अवकाळी पावसामुळे विद्युतवाहिन्यांवर झाडे कोसळून विद्युत पुरवठा बंद होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनात अडचण निर्माण झाली आहे.
 
हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण राकसकोप जलाशयाद्वारे हिंडलगा पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू होता. मात्र  दुपारी 3 नंतर सुरू झालेल्या वादळी पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली होती. परिणामी विद्युत वाहिन्यांचे तसेच विद्युत खांबांचे नुकसान झाले. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. याचा फटका पाणीपुरवठय़ाला बसला आहे.