सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (23:21 IST)

'पोलिसांनी कुलूप तोडलं, आम्ही किचनमध्ये गेलो, चार बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे होते'

murder
दिल्लीचं श्रद्धा वालकर हत्याकांड ताजं असतानाच क्रूरतेचा कळस गाठणारी घटना मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात घडली आणि एकच खळबळ उडाली.
 
3 जून रोजी 32 वर्षीय सरस्वती वैद्यची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 हून अधिक तुकडे करण्यात आल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर प्रेशर कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही आरोपीने केला.
 
हे हत्याकांड मीरा रोडच्या 'गीता आकाशदीप' इमारतीत काही दिवसांपूर्वी घडलं. सरस्वती वैद्य सोबत राहणा-या तिच्या पार्टनरनेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
 
2015 साली 56 वर्षीय मनोज साने आणि 32 वर्षीय सरस्वती वैद्य मीरा रोडच्या 'गीता आकाशदीप' या इमारतीत रहायला आले.
 
लहानपणीच आई-वडिलांना गमावलेल्या सरस्वती वैद्यच्या हत्येने संपूर्ण देश हादरला. दहावीपर्यंतच शिक्षण अनाथाश्रमात राहून पूर्ण केलेल्या सरस्वतीने कधी कल्पनाही केली नसेल की भविष्यात तिच्यासमोर काय वाढून ठेवलं आहे.
 
आम्ही मीरा रोडच्या गीता आकाशदिप इमारतीत पोहचलो तेव्हा सगळीकडेच या प्रकरणाची चर्चा सुरू होती. पोलिसांचा बंदोबस्त आणि रहिवाशांच्या चेहर्‍यावर निराशा आणि भीती दिसत होती.
 
या इमारतीच्या सातव्या मजल्यावर 704 क्रमांकाच्या खोलीमध्ये मनोज साने आणि सरस्वती वैद्य गेल्या सात वर्षांपासून भाड्याने राहत होते.
 
आम्ही पोहोचलो त्यावेळी ही खोली पोलिसांनी सील केली होती. सातव्या मजल्यावर एकूण चार खोल्या आहेत. उर्वरित तीन खोल्यांमधील शेजा-यांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
 
शेजारच्या तरुणाला 'या' कारणामुळे आला संशय
एका शेजाऱ्याने आम्हाला सांगितलं की, "सोमवारपासूनच (3 जून) आम्हाला दुर्गंध येत होता. आम्हाला कळत नव्हतं की हा कुजलेला वास कुठून येतोय. आम्ही आपआपल्या घरांमध्ये उंदीर किंवा पक्षी मेलाय का हे तपासलं. मजल्यावरील तीन खोल्यांमध्ये आम्ही पाहिलं पण काहीच मिळालं नाही. पण दुर्गंध एवढा वाढला की आम्हाला जेवणही जात नव्हतं"
 
मजल्यावरील 704 क्रमांकाची खोली सोडून रहिवाश्यांनी सगळीकडे पाहिलं पण कुठेही उंदीर किंवा एखादा पक्षी मेल्याचं आढळलं नाही.
 
मनोज साने आणि सरस्वती वैद्य कोणाशीही बोलत नसत, कधीही रहिवाशांमध्ये मिसळत नसत, त्यांचा दरवाजाही कधी उघडा नसतो त्यामुळे त्यांच्या खोलीत आम्हाला तपासता आलं नाही, असंही ते म्हणाले.
 
पण पुढच्या 24 तासांत दुर्गंधी प्रचंड वाढली. असह्य होऊ लागल्याने 704 खोलीच्या समोरच राहत असलेल्या तरुणाने त्यांचा दरवाजा ठोठावला. पण समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
 
याच तरुणाला मनोज साने इमारतीखाली अचानक दिसला. तोंडावर मास्क आणि हेल्मेट घालून तो बाहेर चालला होता.
 
या तरुणाने आम्हाला सांगितलं, "मी त्यांना विचारलं की, खूप घाण वास येतोय. तुमच्या घरात आपण तपास करूया की कुजलेला वास कुठून येतोय. पण मनोज साने म्हणाला की मी बाहेर जातोय. रात्री साडे दहानंतर येणार. वास बाजूच्या इमारतीतून येत असेल किंवा घाण पाण्याचा असेल."
 
हा संवाद इथेच थांबला.
 
सगळीकडे तपासलं पण दुर्गंध काही जाईना यामुळे रहिवासी अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने सोसायटीच्या समितीच्या अध्यक्षांना फोन केला. त्यांनी मिळून मनोज सानेला ज्या एजंटने खोली मिळवून दिली त्याला फोन केला. एजंटही पुढच्या अर्ध्या तासात पोहचला.
 
कधीही कोणाशीही दोन शब्दही न बोलणाऱ्या मनोज सानेवर रहिवाशांनाही संशय येऊ लागला. त्याच्या खोलीजवळ गेल्यावर अधिक दुर्गंध येतो असंही सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने नया नगर पोलीस स्टेशनला फोन केला आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहचले.
 
'मी पाहून हादरलोच'
पोलिसांनी कुलूप तोडलं आणि पोलीस खोलीत घुसले. पोलिसांसोबत शेजारी राहणारा तरुण सुद्धा होता.
 
या तरुणाने आम्हाला सांगितलं, "खोलीत जाताच असह्य वास येत होता. त्याच्यासोबत राहणारी महिलाही कुठे दिसत नव्हती. कुजलेला वास येत असल्याने पोलिसांनाही लगेच शंका आली. त्यांनीही व्हीडिओ रेकाॅर्डिंग सुरू केलं. आम्ही आधी हाॅल पाहिला पण काहीच आढळलं नाही. यानंतर बेडरुममध्ये बेडवर काळ्यारंगाचं प्लॅस्टिक पसरलेलं होतं. मला वाटलं की या खाली मृतदेह असेल पण तिथेही काही नव्हतं."
 
"दुसर्‍या बेडरुममध्येही काही सापडलं नाही. मग आम्ही किचनमध्ये गेलो आणि मी हादरलोच. किचनमध्ये चार बदल्यांमध्ये मृतदेहाचे ओळखताही येणार नाही असे तुकडे कापलेले दिसले. किचनच्या बेसिनमध्ये हाडं होती. हे सगळं भयंकर होतं. पोलिसांनी त्यांची प्रक्रिया सुरू केली,"
 
"आम्ही आता मनोज सानेची वाट पाहत होतो. पोलिसांनी आम्हा शेजा-यांना सांगितलं की तुम्ही कोणालाही काहीच कळवू नका. पोलीस बाईकवर आले होते त्यामुळे इमारतीखाली पोलिसांची गाडी नव्हती. जवळपास रात्रीच्या 8. 30 वाजता साने इमारतीत पोहचला. पोलीस आलेत याची त्याला कल्पना नव्हती,"
 
"तो लिफ्टने सातव्या मजल्यावर पोहचला. लिफ्टचा एक दरवाजा उघडताच समोर उभ्या असलेल्या एजंटने त्याला ओळखलं आणि तो म्हणाला हाच आहे तो ज्याला मी रुम दिली. हा मनोज साने आहे. पोलिसांनी तात्काळ त्याला आपल्या ताब्यात घेतलं,"
 
दरवाजा बंद करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला. सुरुवातीला त्याने सांगितलं की,"हे कुठल्यातरी जनावराचे तुकडे आहेत."
 
'लिफ्टमध्ये दिसली की पाहून हसायची'
सरस्वतीच्या अगदी समोरच्या खोलीत राहणाऱ्या श्रीवास्तव कुटुंबातील महिलेशी आम्ही संवाद साधला.
 
दोन दिवसापासून झोप उडाली आहे. तिचा हसरा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय असं सांगत त्या भावनिक झाल्या.
 
"तिला काही त्रास दिला जात होता का माहिती नाही पण तिने मदत मागितली असती, ती काही बोलली असती तर आम्ही तीन कुटुंबांनी मिळून तिला नक्की मदत केली असती," असं त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे सांगतात, "ती कधीच माझ्याशी किंवा इतर शेजा-यांशीही कधी बोलली नाही. कधीतरी लिफ्टमध्ये दिसली की पाहून हसायची. भाभी कैसे हो? असं मी विचारल्यावरही मान हलवून स्मित हास्य करायची आणि निघून जायची. त्यांच्या घरातून कधी भांडणाचाही आवाज आला नाही. यामुळे आम्हालाही कधी संशय आला नाही की ती अडचणीत आहे किंवा त्रासात आहे."
श्रीवास्तव कुटुंब दहा वर्षांपूर्वी या इमारतीत रहायला आलं. 2015 मध्ये हे दोघं इथे भाड्याने रहायला आले. कधी कोणाशी बोलणं नाही की कोणत्या कार्यक्रमात, सण, उत्सवात सहभाग नाही.
 
"आमचे दरवाजे सतत उघडे असतात. लहान मुलं आत-बाहेर करत खेळत असतात. संध्याकाळी दरवाजा उघडा असतो. आम्ही तीन कुटुंब कायम संपर्कात असतो. दिवाळी, होळी, नवरात्र असे सगळे सण एकत्र साजरे करतो पण ते दोघंही कधी दरवाजा उघडत नसत. आमच्याकडे कार्यक्रमाला आम्ही बोलवलं होतं पण अनेकदा सांगूनही ते आले नाहीत. मग आम्हीही कधी पुन्हा बोलवलं नाही,"
 
त्यांचं लग्न झालंय की नाही हे सुद्धा कधी कळलं नाही. त्यांच्याकडे कधी कोणी नातेवाईक आल्याचंही आम्ही पाहिलं नाही असंही त्या सांगत होत्या.
 
'त्यांनी मंदिरात लग्न केलं होतं पण...'
गेल्या दोन दिवसांपासून मीरा रोड पोलीस या हत्येचा तपास करत आहेत.
 
आरोपी मनोज साने पोलिसांच्या कस्टडीत असून त्याचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे.
 
मनोज साने वारंवार आपला जबाब बदलत असून सरस्वतीने आत्महत्या केल्याचा दावा त्याने केल्याची माहिती समोर येतेय. आत्महत्या केल्याने गुन्हा आपल्यावर येईल आणि पोलीस पकडतील या भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असाही दावा आरोपीने केला आहे.
 
सरस्वतीचे आई-वडील ती लहान असतानाच विभक्त झाले होते. यानंतर सरस्वती तिच्या आईसोबत राहत होती. पण काही वर्षातच आईचंही निधन झालं.
 
चार बहिणींमध्ये वयाने सर्वात लहान असलेली सरस्वती एकटी पडली आणि तिच्या देखभालीसाठी तिला अनाथाश्रमात दाखल करण्यात आलं.
 
औरंगाबाद येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारी सरस्वती कमी वयातच अहमदनगर जिल्ह्यातील एका खासगी अनाथाश्रमात पोहचली.
 
पहिली ते दहावीपर्यंतच शिक्षण तिने तिथेच राहून पूर्ण केलं. वयाच्या 18 वर्षांनंतर मात्र तिला अनाथालय सोडावं लागलं. यानंतर ती आपल्या बहिणीकडे जवळपास 4 वर्षं राहिली. नोकरीसाठी मात्र तिला मुंबई गाठावी लागली.
 
मुंबईत ती नोकरीच्या शोधात होती. या दरम्यान तिची भेट मनोज सानेशी झाली. नोकरी मिळवून देतो असं त्याने सांगितलं. बोरीवली येथील त्याच्या फ्लॅटमध्ये ती काही दिवस राहिली. यानंतर दोघंही 2015 पासून मीरा रोडला रहायला आले.
 
मीरा रोडचे पोलीस उपायुक्त जयंत बजबाले यांनी सांगितलं, "मयत सरस्वती वैद्य आणि आरोपी मनोज साने यांचं लग्न झालं होतं. मंदिरात त्यांनी लग्न केलं होतं अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सरस्वतीच्या तीन बहिणींनाही याची पुष्टी केली आहे. दोघांनी मंदिरात लग्न केल्याचं सरस्वतीच्या बहिणींना तिने सांगितलं होतं."
 
पोलिसांनी शुक्रवारी (9 जून) मृत महिलेच्या 3 सख्ख्या बहिणींचा जबाब नोंदवला आहे. हा जबाब तपासाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे कारण सरस्वती आपल्या बहिणींच्या संपर्कात होती.
 
आरोपी मनोज सानेचं वय आणि मुलीचं वय यात खूप अंतर असल्याने लग्नाची बाब त्यांनी लपवली. याच कारणामुळे ती ओळख सांगताना मनोज साने 'मामा' असल्याचं सांगायची.
 
दरम्यान, सरस्वतीची हत्या नेमकी का करण्यात आली, यामागे कारण काय याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. तपास सुरू असल्याचं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
सध्या बहिणींचा डीएनए तपासला जात असून मृतदेह त्यांच्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 




Published By- Priya Dixit