1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: यवतमाळ , सोमवार, 14 जानेवारी 2019 (10:36 IST)

राजकारण्यांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : गडकरी

Politicians
92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  
 
राजकारणाचा अर्थ राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पण दुर्दैवाने आता सत्ताकारणाभोवतीच राजकारण फिरत आहे. राजकारणाची सीमित मर्यादा आहे. म्हणून राजकारणी लोकांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संमेलन वादावरून राज्य सरकारला घरचा अहेर दिला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सारोपाच्या भाषणात गडकरी बोलत होते.
 
ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून पाठवलेले निमंत्रण मागे घेतल्यामुळे वादात सापडलेल्या संमेलनात गडकरी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. गडकरी यांनी सहगल यांचा थेट उल्लेख न करता साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला. साहित्य, शिक्षण, कला अशा कोणत्याच क्षेत्रात राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये, असे ते म्हणाले. आपला मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणाले, आणीबाणीच्या वेळी पुलं आणि दुर्गा भागवतांच्या सभांना राजकारण्यांच्या सभांपेक्षा जास्त गर्दी व्हायची. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सभा घेतो, राजकारणात येण्यासाठी नव्हे, असे ते सांगायचे. लोकतांत्रिक मूल्यांकरिता त्यांनी संघर्ष केला, पण आपले काम झाल्यावर बाजूला सरले. राजकारणी, साहित्यिक यांच्यात संवाद हवा. मतभिन्नता असेल तरी हरकत नाही पण मनभेद असू नयेत. आपल्याला विरोध करणार्‍या माणसाचा सन्मानच करायला हवा.