रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जानेवारी 2019 (09:01 IST)

स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजप सरकार समाजासमाजात तेढ निर्माण करत आहे - भाजप-सेनेवर राष्ट्रवादीची टीका

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा  नवी मुंबईत दाखल झाली. सत्ताधारी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी परिवर्तनाची यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसने काढली आहे.
 
आज फार मोठ्या जबाबदारीने पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. कुणी काय खायचं आणि कसं लिहायचं हे सरकार ठरवत आहे. आज संविधान धोक्यात आहे. मुस्कटदाबी सुरू आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कांद्याला दोनशे रुपये दिले त्याच्या उपयोगच नाही. शेतकऱ्यांनी स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.
 
नरेंद्र मोदी हे आपल्या सोबत मन की बात आणि अदानी-अंबानी सोबत धन की बात करतात अशी टीका करत आमदार छगन भुजबळ यांनी सरकारची खिल्ली उडवली.
 
अठरापगड जातींचा हा देश व राज्य आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वाट्टेल तो कारभार भाजप सरकार करत आहे. सुरुवातीला जातीजातीमध्ये भांडणे लावली जात होती आणि आता यांनी देवांनाही जातीत विभागायला सुरुवात केली आहे हे गंभीर असून हे रोखले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. अजितदादा पवार यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत व्यक्त केले.
 
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत असून याला सेना-भाजपचे सरकार जबाबदार आहे. या सरकारच्या फक्त विकासाच्या गप्पा सुरू आहेत. कुठे आहे विकास, कुठे आहे स्वच्छ भारत, कुठे आहे भ्रष्टाचार मुक्त भारत असा सवालही आ. अजितदादा पवार यांनी केला.
 
गेली पंधरा वर्ष कोणतीही करवाढ झाली नाही अशा शहरांमध्ये आपण आज उभे आहोत. नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला अभिमान आहे. कारण नवी मुंबई हे राहण्यायोग्य शहर आहे. मुंबईकरांना आज विविध समस्या वाट्याला येत आहे. पण नवी मुंबई हे योग्य नियोजन करून बनवलेले शहर आहे. मुंबई, ठाणे शहरामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाणी तुंबते, पण नवी मुंबई कधीच तुंबत नाही. कारण नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करून दाखवला आहे. अच्छे दिन खऱ्या अर्थाने नवी मुंबईत आले असे वक्तव्य राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. आणि हे सगळे शक्य झाले ते म्हणजे मा. गणेश नाईक यांच्या नेतृत्वामुळेच आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे असेही मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 
२o१४ साली मोदींनी अनेक आश्वासनं दिली, अच्छे दिन येणार सांगितले. आता अच्छे दिन चेष्टेचा विषय झाला आहे. जेव्हा देशात पेट्रोल पन्नास रुपये होतं, डाळ साठ रुपये होती. महागाई आटोक्यात होती तेव्हा शिवसेना-भाजपचे हे बांडगूळ महागाई वाढल्याचे सांगत होते. आज युपीए सरकारच्या काळापेक्षा पेट्रोल,डाळ सर्वच वस्तूंचे भाव दुपटीने वाढले असल्याची खरमरीत टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आ. धनंजय मुंडे यांनी केली. गेले पाच दिवस बेस्ट चा संप चालु आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाई केली जात आहे त्यांना घराबाहेर काढले जात आहे. कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. महापालिका, परिवहन खाते फक्त पाहत बसलं असल्याची टीका देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील प्रसंगी रस्त्यावरही उतरेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले तर बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी चांगले निर्णय घेऊ, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.