सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (15:05 IST)

दुर्देवी! लग्नाहून परतताना झाडाखाली थांबले, वीज कोसळून आई-वडील ठार तर दोन्ही मुली जखमी

बदलत्या हवामानामुळे कोसळलेल्या वीजेने एका दाम्पत्याचा जीव घेतला असून या दाम्पत्याच्या दोन्ही अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे ही दुर्घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. वीजेचा कडकडाट झाला आणि अचानक वीज कोसळली. यादुर्घटनेत मालुंजेवाडी येथील पती आणि पत्नी जागीच ठार झाले आहेत. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
 
तहसिलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ दामू लोते (वय 35) आणि सुनीता दशरथ लोते (वय 30) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.  हे दोघे जण गिऱ्हेवाडी येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. वादळी पाऊस आल्याने पिंपळगाव घाडगा येथील गोपाळ किसन देवगिरे यांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाजवळ ते थांबले. मात्र त्याचवेळी सळसळती वीज कोसळली. त्यात हे दोघेही जागीच ठार झाले. सोबत असलेल्या मुली तेजस्विनी लोते (वय 7), सोनाली लोते (वय 5) यांच्यासह गिऱ्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिऱ्हे (वय 20) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी ४ ते ५ च्या सुमाराला घडली. घटनास्थळी पीआय अनिल पवार पोलीस हवालदार विलास धारणकर, भाऊसाहेब भगत, निलेश मराठे, तलाठी एस. एन. रोकडे यांनी भेट देऊन कार्यवाही केली.लोते कुटुंबियांवर कोसळलेली ही वीज आणि त्यामुळे झालेली दुर्घटना यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या प्रकृतीमुळेही ग्रामस्थ काळजीत आहेत.