मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (12:03 IST)

एल्गार परिषद खटला विशेष एनआयए कोर्टाकडे वर्ग

पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी दाखल खटला मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाकडे वर्ग करण्यास पुणे कोर्टाने मंजुरी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टाने यासंबंधी आदेश दिला. पुणे कोर्टाने तसे ना हरकत पत्रही दिले आहे. दरम्यान, कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेण्याचा केंद्राचा निर्णय अयोग्य असून त्याला संमती देण्याचा राज्य सरकारचा त्याहून अयोग्य असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. एल्गार परिषद प्रकरणी पुणे कोर्टात दावा दाखल होता. हा दावा आता विशेष एनआयए कोर्टात चालणार आहे.
 
एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत होते. मात्र, अचानकपणे केंद्र सरकारने हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेत राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या पथकाने पुण्यात येऊन या प्रकरणी सर्व कागदपत्रे स्वत:कडे घेतली होती. एनआयएने एल्गार परिषद प्रकरणी नव्याने तपास सुरू करत ३ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये एकूण ११ जणांची नावे असून त्यापैकी नऊ जण सध्या तुरुंगात आहेत.