पुणे ते छत्रपतीसंभाजी नगर अवघ्या दोन तासांत, नव्या एक्स्प्रेस हायवेची गडकरींची घोषणा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भाजपचे नेते नितीन गडकरींनी पुणे आणि छत्रपती संभाजी नगरला जोडणाऱ्या नव्या एक्स्प्रेस हायवेची घोषणा केली आहे. या एक्स्प्रेसने पुणे ते छत्रपती संभाजी नगर अवघ्या दोन तासांत पूर्ण होईल. या प्रोजेक्ट्साठी सुमारे 16 हजार 318 कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे.
सध्या पुणे ते छत्रपती संभाजी नगर सहा ते साडे सहा तासांत पोहोचले जाते. या नव्या एक्स्प्रेस हायवे ने कमी वेळातच पोहोचता येईल.
या विषयी माहिती देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आम्ही पुणे ते छत्रपती संभाजी नगर जाण्यासाठी नवीन एक्स्प्रेस हायवे बांधत आहोत. यासाठी सुमारे 16 हजार 318 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. या प्रकल्पाचा एमएयू झाला असून पहिला रस्ता पुणे, अहिल्यानगर आणि संभाजी नगर असा असणार. हा रस्ता आधी पूर्णपणे चांगला करणार आहोत. या रस्त्यावर काही ठिकाणी पूल बांधणार आहोत. या साठी दोन हजार कोटींचा खर्च येणार आहे.
या व्यतिरिक्त शिक्रापूर येथून सुरु होणारा रास्ता दुसरा असेल. तो अहिल्यानगरच्या बाहेरील भागातून थेट बीड जिल्ह्यात जाणार असून हा हायवे संपूर्णपणे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवे असणार आहे. या टप्प्यासाठी 16 हजार 318 कोटींची तरतूद करण्यात आली असून बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
एका टोल संदर्भातील निर्णय प्रलंबित असून त्यावर निकाल लागल्यावर कामाला सुरुवात होणार. या कामासाठी दोन ते तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर संभाजीनगर ते पुणे हे अंतर दोन तासांत, तर संभाजीनगर ते नागपूर हे अंतर सुमारे अडीच तासांत पार करता येणार आहे. एकूणच हा एक्स्प्रेस हायवे पुणे ते नागपूर असा विस्तारित मार्ग असणार असल्याचे गडकरी यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
Edited By - Priya Dixit