शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (08:18 IST)

नाशिक न्यायालयात बोगस जामीनदारांचे रॅकेट; न्यायालयाच्या गोपनीय चौकशीत उघड

court
नाशिक न्यायालयात चक्क बोगस जामीनदारांचे रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने केलेल्या गोपनीय चौकशीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळेच याप्रकरणी आता सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये २० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
न्यायालयाने केलेल्या गोपनीय चौकशीतून हे स्पष्ट झाले की जिल्हा व सत्र न्यायालयात बोगस जामीनदारांचे रॅकेट सक्रीय आहे. गेल्या वर्षभरात ८० पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये न्यायालयाची दिशाभूल झाल्याचे अहवालात म्हटले आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी बोगस जामीनदारांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यामध्ये युवराज नानाजी निकम (रा.खामखेडा ता.देवळा),मधुकर जाधव (रा.पिंपळगाव बहुला),लक्ष्मण एकनाथ खडताळे (रा.राजीवनगर,गोवर्धन), रिना उर्फ निता नवले (रा.रविवार पेठ),मंगल संजय वाघ ( रा.पेठगल्ली,गंगापूरगाव), राधिका उर्फ रजीया शकिल खाटी (रा.पाथर्डी गाव),इकबाल पिंजारी (रा.वडाळागाव),परा. (रा.जातेगाव),राजू वाघमारे (रा.त्र्यंबकेश्वर),रवि मोतीराम पाटील (रा.मातोरी),कल्पना पाटील,इमरान पिंजारी व जावेद पिंजारी आदींचा समावेश आहे.
 
याप्रकरणी सहाय्यक अधिक्षक रविंद्र गाडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. मार्च २१ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील ८१ प्रकरणांमध्ये संशयितांनी न्यायालयाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. न्यायालयीन अभिलेखाचे बनावटीकरण, बनावट दस्ताऐवज खरा म्हणून वापरणे, तोतयागिरी, फसवणूक या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांतील संशयितांना सुटकेसाठी जामीनदारांची गरज असते. आणि ही गरज ओळखूनच बोगस जामीनदारांचा सुळसुळाट झाला आहे. आरोपींच्या नातेवाईकांकडून कागदपत्रांची पूर्तता वेळेवर उपलब्ध होत नसल्याने बोगस जामीनदार पुढे सरसावत आहेत. आता गोपनीय अहवालातून ही बाब समोर आल्याने न्यायालयीन वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आता याप्रकरणी पोलिस तपासात काय काय निष्पन्न होते तसेच आणखी किती जणांवर गुन्हे दाखल होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, याप्रकरणी वकीलांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.