रेल्वेचा मोठा निर्णय: दादर-भुसावळ खानदेश एक्सप्रेस आता आठवड्यातून सहा दिवस धावणार
रेल्वेने दादर-भुसावळ खानदेश एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवल्या आहे. १ ऑगस्टपासून ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावेल आणि तिला बोईसर व डहाणू रोड स्थानकांवर अतिरिक्त थांबेही असतील. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने दादर-भुसावळ खानदेश एक्सप्रेसच्या (गाडी क्रमांक १९००३/१९००४) फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आता शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. याव्यतिरिक्त, प्रवाशांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, बोईसर आणि डहाणू रोड स्थानकांवर अतिरिक्त थांबे जोडण्यात आले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १९००३ दादर-भुसावळ खानदेश एक्सप्रेस आता १ ऑगस्टपासून दादरहून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सुटेल. याचा अर्थ, ही गाडी यापुढे केवळ शुक्रवारी धावणार नाही. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक १९००४ भुसावळ-दादर खानदेश एक्सप्रेस देखील १ ऑगस्टपासून भुसावळहून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सुटेल. बोईसर आणि डहाणू रोड हे नवीन थांबे असतील.
पश्चिम रेल्वेने या गाडीला बोईसर आणि डहाणू रोड स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यान प्रवास करणाऱ्या पालघर जिल्हा आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना मोठी सोय होईल.
ही गाडी या स्थानकांवर थांबेल.
दोन्ही दिशांना धावणारी खानदेश एक्सप्रेस बोरिवली, विरार, पालघर, बोईसर, डहाणू रोड, वापी, वलसाड, नवसारी, भेसन, चालथान, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाइचा, सिंदखेडा, नारदाना, अमळनेर, धरणगाव आणि जळगाव स्थानकांवर थांबेल. पश्चिम रेल्वेचा विश्वास आहे की, ट्रेनची वारंवारता वाढल्याने आणि नवीन थांबे जोडल्याने मुंबई, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट फायदा होईल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
Edited By- Dhanashri Naik
