1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (07:14 IST)

इर्शाळवाडीत पावसामुळे बचावकार्य थांबवलं, 16 मृत्यू, 139 अजूनही बेपत्ता

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 103 जणांना शोधण्यात यश आलं आहे. अजून 139 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफनं ही माहिती दिली आहे.
 
रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.
 
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्यामुळे सध्या बचावकार्य थांवण्यात आलं आहे. उद्या सकाळी ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
 
इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तिथं मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इरशाळवाडीजवळ नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.
 
अतिमुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.
 
मदतकार्यासाठी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे पथ इर्शाळवाडी येथे जात असताना पथकातील कर्मचारी शिवराम यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे.
 
मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
 
दरम्यान, विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सर्व माहिती क्रमवार सांगितली.
 
 
देवेंद्र फडणवीसांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे
 
इर्शाळवाडी उंच डोंगरावर पायथ्याशी वसलेली आहे. इथे जाण्यासाठी रस्ता नाही. मानवली गावातून पायी जावे लागते.
48 कुटुंब वास्तव्यास आहेत. 228 लोकसंख्या
गेल्या तीन दिवसात 499 mm पावसाची नोंद
सदर घटना रात्री साडे दहा- अकराच्या सुमारास घडली. जिल्हा प्रशासनाला साडे अकराच्या सुमारास माहिती मिळाली
वाडी उंचावर दुर्गम भागात असल्याने उतार जास्त असल्याने दळणवळण प्रमुख रस्त्याला जोडलेले नाही
दरड प्रवण क्षेत्रात ही इर्शाळवाडी समाविष्ट करण्यात आलेली नाही. यापूर्वी अशी कोणतीही घटना घडलेली नाही
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच सकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. शिंदे यांनी इर्शाळवाडीतील परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच संबंधितांना बचावकार्याबाबत सूचनाही केल्या.
 
"राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यकता भासेल तिथे लोकांना हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे.
 
ज्या ज्या ठिकाणी पूराचा धोका आहे, तिथे NDRF तैनात करण्यात आलेलं आहे", अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “इर्शाळवाडी गावात जवळपास 40-45 घरे आहेत. त्यापैकी 15 ते 17 घरे ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. NDRF, SDRF आणि TDRF यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
 
इर्शाळवाडी हे गाव उंचावर असल्याने त्याठिकाणी कोणतीही वाहनव्यवस्था, यंत्रसामुग्री पोहोचू शकत नाही. अशा स्थितीत मनुष्यबळाच्या माध्यमातूनच बचावकार्य करण्यात येत आहेत.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही माझी चर्चा झाली. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. कोणतीही मदत आवश्यक असल्यास सांगा, असं त्यांनी सांगितलं.
 
वायूदलाशीही मी संवाद साधला. पण बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येऊ शकत नाही. पाऊस आणि हवामानही खराब आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून शक्य तितते प्रयत्न करून बचावकार्य सुरू आहे. सध्या तरी आमचे प्राधान्य बचावकार्य वेगाने करण्याला आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती
या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 75 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये दिली होती.
 
याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
 
ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.
 
या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून हा आकडा वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.
 
इर्शाळवाडी या गावात जवळपास 40 घरे असून तिथे जवळपास 250 जण राहतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
 
इर्शाळवाडीकडे जाणारा रस्ता पावसामुळे अत्यंत निसरडा झाल्याने बचाव पथकाला तिथे पोहोचण्यात प्रचंड अडथळे येत आहेत.
 
आतापर्यंत या दुर्घटनेत अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. पण 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये बचाव पथकातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
इर्शाळवाडीच्या शेजारच्या गावातील रहिवासी गडाच्या खालील बाजूस जमा झाले आहेत. इर्शाळवाडीतील आपल्या नातेवाईकांना पाहायला जायचं आहे, म्हणत पाड्यावर जाऊ देण्याची विनंती स्थानिक रहिवासी करत आहेत. पण अजून तरी पोलिसांनी कोणालाही वर जाण्यापासून रोखलेलं आहे.
 
स्थानिकांकडून मदतीचा ओघ
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-खालापूरचे सर्व अधिकारी, पोलीस यंत्रणा, NDRF टीम यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत महाजन, आदिती तटकरे, आमदार महेश बालदी, सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ साठीलकर यांच्या टीमचे सदस्य घटना स्थळी पोहचले आहेत.
 
या माध्यमातून इर्शालवाडीकडे मदतीचा ओघ चालू झाला आहे. 10 टेन्ट घेऊन कोंढाणा टीमचे प्रथमेश जाधव, प्रदिप गोगटे घटनास्थळी पोहचले. तर रोटरी क्लबच्या माध्यमातून चादरी, ब्लँकेट, पाणी, बिस्कीट पुडे घेऊन सुनील सोनी आणि सदस्य कर्जतमधून रवाना झाले आहेत.

Publishd By- Priya dixit