शेतकऱ्यांना काहीसा दिलासा: सिंधुदुर्ग, जळगाव आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली
शेतकऱ्यांना दिलासा काहीसा दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग, जळगाव आणि कोकणातील इतर भागांतही पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा सध्या ८.६८ टक्क्यांवर आल्याने चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग, जळगाव आणि कोकणातील इतर भागांत रत्नागिरी, रायगड येथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पण हवामान विभागाने शेतकऱ्यांना शेतात पुरेसा ओलावा म्हणजेच किमान ६५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.
सिंधुदुर्ग, जळगाव आणि कोकणातील इतर भागांतही पावसाने तब्बल १५ ते २० दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल झाला होता, परंतु हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे पाऊस गायब झाला होता. आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधुदर्गातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला आहे. आंबोली परिसरातील घटप्रभा नदीला पूर आला असून, पावसाअभावी सुकू लागलेल्या भातरोपांना यामुळे नवीन जीवनदान मिळाले आहे.
तसेच जळगावसह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांतील प्रचंड उकाड्यानंतर मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, जे आता पाऊस सक्रिय झाल्याने टळले असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे देवगड आणि आंबोली परिसरातील प्रसिद्ध धबधबे अजूनही कोरडेच आहे, ज्यामुळे येथील पावसाळी वर्षा पर्यटन काहीसे लांबणीवर पडले आहे.
Edited By- Dhanashri Naik
