शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (13:07 IST)

राज ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेट: निमित्त कौटुंबिक भेटीचं पण चर्चा नव्या युतीची?

- मयुरेश कोण्णूर
भाजपा नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई दादरला राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सपत्नीक भेट घेतल्यानंतर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.
 
ही व्यक्तिगत आणि कौटुंबिक भेट असल्याचं दोन्ही बाजूंनी सांगितलं जातं आहे, पण राजकीय हवा तापली आहे.
 
गेल्या काही काळापासून, जेव्हापासून शिवसेनेनं भाजपाशी काडीमोड केला, तेव्हापासून मनसे-भाजपा या नव्या युतीची महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. त्यात मनसेनं त्यांच्या झेंड्यामध्ये पूर्ण भगवा रंग आणल्यापासून आणि हिंदुत्ववादी भूमिका घेणं सुरू केल्यापासून ते भाजपाच्या जवळ जात आहेत असंही म्हटलं जातं आहे.
 
मुंबई आणि इतर शहरांतल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं ही राजकीय युती प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
 
या पार्श्वभूमीवर आजची फडणवीस यांची राज यांच्या निवासस्थानी भेट महत्त्वाची आहे.
 
राज हे नुकतेच दादरच्या शिवाजी पार्क इथल्या 'शिवतीर्थ' या नव्या त्यांच्या निवासस्थानी राहायला गेले आहेत. तिथे फडणवीस यांनी राज यांच्या आमंत्रणावरुन भेट दिली. सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही होत्या.
 
'राजकीय अर्थ काढू नका'
जवळपास दोन तासांच्या या भेटीदरम्यान दोन्हीही नेते माध्यमांशी मात्र बोलले नाहीत. अर्थात मध्येच पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीत येऊन काही काळ त्यांनी गप्पा मारल्या आणि माध्यमांना त्यांचा फोटो मिळाला. नंतर 'मनसे'नं या भेटीचे सहकुटुंब घरातले फोटो ट्वीट सुद्धा केले. पण दोन्ही नेते माध्यमांशी याभेटीबद्दल बोलले मात्र नाही.
 
"ही एक कौटुंबिक आणि अनौपचारिक भेट होती. त्यामुळे त्यात काही राजकीय निर्णय झालाअसल्याची शक्यता नाही. बाकी आमच्यापैकी तिथे कोणी उपस्थित नव्हते, म्हणून त्यावर अधिक काही बोलता येणार नाही," असं मनसेचे नेते संदिप देशपांडे म्हणाले.
 
भाजपानंही आजच्या भेटीवर हीच भूमिका घेतली आहे की ही राजकीय भेट नव्हती.
 
"नवीन घरी देवेंद्रजी भेटण्यासाठी गेले होते. ही कौटुंबिक भेट होती. त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये. आणि सध्या तरी कोणत्याही राजकीय युतीबाबत भाजपामध्ये चर्चा सुरु नाही," असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी 'बीबीसी मराठी'ला सांगितलं.
 
पण दोन राजकीय नेते एकत्र भेटतात तेव्हा राजकारणाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. प्रश्न इतकाच आहे की ज्या युतीची शक्यता, जरी अधिकृतरीत्या नसली तरीही, दोन्ही बाजूंकडून बोलून दाखवली जाते आहे, ती प्रत्यक्षात कशी येणार? भाजपा आणि मनसेच्या दोन्ही बाजूंकडचे काही मुद्दे जमेचे आहेत तर काही अवघड.
 
हिंदुत्ववाद जोडणार की प्रांतवाद अंतर वाढवणार?
काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांनी राज यांची निवासस्थानी येऊन भेट घेतली होती. पण ही युतीसंदर्भातली चर्चा नसून एकमेकांच्या भूमिका समजून घेण्याबद्दलची भेट होती असं पाटील तेव्हा म्हणाले होते. पण 'मनसे'सोबत गेल्यावर उत्तर भारतींयांबद्दलच्या भूमिकेबद्दल असणारी चिंता त्यांच्या बोलण्यात होती.
 
त्या भेटीत राज यांनी त्यांनी परप्रांतियांबद्दलची त्यांची भूमिका समजावून दिली आणि ती कटुतेची नाही असं सांगितलं, असं पाटील म्हणाले होते. "त्यांनी अशी भूमिका आम्हाला समजावली, पण ती व्यवहारात पण आणायला लागेल. ती व्यवहारात आणणं हे सोपं नाही आहे.
 
"मला आज हे पूर्ण पटलं की त्यांच्या मनात परप्रांतियांबद्दल काहीही कटुता नाही. पण महाराष्ट्रातल्या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी ते जे आंदोलन करतात त्यातून असं प्रतीत होतं की त्यांच्या मनात परप्रांतियांबाबत कटुता आहे. पण ती नाहीये हे प्रत्यक्ष व्यवहारात यावं लागेल," असं चंद्रकांत पाटील तेव्हा म्हणाले होते.
 
उत्तर भारतीयांबद्दलच्या राज यांच्या पूर्वीच्या आंदोलनांमुळे भाजपाला मुंबई महापालिकेत आणि उत्तर प्रदेशातही अडचण निर्माण होईल असा भाजपाअंतर्गत एक मतप्रवाह आहे.
 
सोबतच मुंबई शिवसेनेच्या मराठी मतांच्या बालेकिल्ल्याला धडक द्यायची असेल तर त्यांना मनसेची गरजही भासते आहे.
 
गेल्या काही काळांमधल्या मनसे-भाजपाच्य जवळीकीच्या चर्चांबद्दल बोलतांना ज्येष्ठ पत्रकार संदिप प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी 'बीबीसी मराठी'शी बोलतांना असं म्हटलं होतं की, "राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांसंदर्भातील भूमिका जाहीर आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांआधी राज ठाकरेंसोबत जाताना भाजपचे नेतृत्व विचार करेल. पण अप्रत्यक्ष युतीची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही.
 
"मनसेच्या प्रबळ जागा आहेत त्याठिकाणी भाजप प्रबळ उमेदवार देणार नाही आणि भाजपच्या जागांसाठी मनसे सुद्धा उमेदवार देणार नाही अशा पद्धतीने एकत्र येणं शक्य आहे का? असा विचार होऊ शकतो," असं प्रधान सांगतात.