शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (14:46 IST)

ऋतुजा लटकेंना राज ठाकरेंचा पाठिंबा, देवेंद्र फडणवसींना लिहिलं पत्र

raj thackeray devendra
अंधेरी पूर्व पोट निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे. भाजपने अंधेरी पूर्व येथील पोट निवडणूक लढवू नये, ऋतुजा लटके यांच्यासाठी ही जागा सोडावी, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.
 
एकच जागा असली तरी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. असे असताना राज ठाकरे यांनी आपला उमेदवार न उभा करण्याचा निर्णय तर घेतलाच आहे पण त्याच वेळी ऋतुजा लटके यांच्याविरोधात उमेदवारच देऊ नका, असे आवाहन भाजपला केले आहे.
 
दरम्यान, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावरील भूमिका स्पष्ट केली.
 
आज सकाळी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मनसेकडून पाठिंबा मागितला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी ही निवडणूक लढवू नका अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे. तसेच निवडणुकीबाबत मी एकटाच निर्णय घेऊ शकत नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले."
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे.
 
"आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका," असे ट्वीट करून राज ठाकरे यांनी आपले पत्र त्यासोबत जोडले आहे.
 
"रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते, शिवसेना शाखाप्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. त्यांची पत्नी ऋतुजा लटके या आमदार होतील हे भाजपने पाहावे. त्या आमदार झाल्यावर दिवंगत नेत्याच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आपली भावना आहे," असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल सामना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना-भाजपा युती अशा दोन गटात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक होणार आहे.
 
भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
 
ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
 
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली.
परंतु ही घोषणा होण्यापूर्वी ऋतुजा लटके या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या.
 
मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 कार्यालयात त्या कार्यकारी सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला.
 
ऋतुजा लटके या राजकारणात नव्हत्या पण त्यांचे पती रमेश लटके या मतदारसंघात दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत रमेश लटके विजयी झाले.
 
2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव केला तर 2019 मध्ये ते शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले.
 
रमेश लटके आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे रमेश लटके या मतदारसंघात जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय आहेत.
 
रमेश लटके यांची मतदारसंघावर चांगली पकड असल्यानेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाणकार सांगतात.
 
काँग्रेस ते भाजपा मुरजी पटेल यांचा प्रवास
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा मुरजी पटेल अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
 
2019 मध्ये भाजपा-शिवसेना यांच्या युतीने विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यावेळी मुरजी पटेल यांना भाजपाकडून निवडणूक लढवता आली नव्हती. ही जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली आणि रमेश लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
 
यावेळी मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत रमेश लटके यांनी जवळपास 16 हजार मतांनी मुरजी पटेल यांचा पराभव केला.
 
आता पोटनिवडणुकीसाठी मात्र भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट) यांच्या युतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
 
2015-16 या काळात मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी केसरबेन पटेल या काँग्रेसच्या तिकिटावर 2012 मध्ये नगरसेविका होत्या.
 
भाजपात प्रवेश केल्यानंतर 2017 मध्ये मुरजी पटेल आणि केसरबेन पटेल या दोघांनीही महानगरपालिका निवडणूक लढवली. दोघंही भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक बनले. परंतु जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्यांचं कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं.
 
जनप्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या माध्यमातूनही मुरजी पटेल कार्यरत आहेत. अंधेरी पूर्व एमआयडीसी या परिसरात जनप्रतिष्ठान संस्थेचं कार्यालय आहे.
 
ही निवडणूक महत्त्वाची का ठरत आहे?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण तापलंय. गेल्या काही काळात वेगाने राजकीय घडामोडी सुद्धा घडल्या.
 
शिवसेनेत शिंदे गटाने बंड केल्यानंतर संघटना पुन्हा उभी करण्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी चांगली संधी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
शिवसेना कोणाची? या प्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. परंतु या दरम्यान ही पोटनिवडणूक आल्याने या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केली.
 
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हे युद्ध इथेच थांबलं नाही. तर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा पक्षाचे दोन स्वतंत्र दसरा मेळावे घेण्यात आले. दोन्ही गटांच्या नेतृत्त्वाने एकमेकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून नवीन संकट उभं राहिलं. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी ऋतुजा लटकेंना थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागली.
 
ही पार्श्वभूमी पाहता ही पोटनिवडणूक आता केवळ मुंबईतल्या एका मतदारसंघाची राहिलेली नाही. तर सुरू असलेल्या राजकीय संघर्षासाठी दोन्ही गटांना या निवडणुकीच्या निमित्ताने खुलं मैदान मिळालं आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "फुटलेल्या शिवसेनेची आता मुंबईत किती ताकद आहे याची लिटमस टेस्ट या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. म्हणून या निवडणुकीला महत्त्व आहे. मोठ्या संख्येने आमदार ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंची ताकद आहे की नाही याचा अंदाज यानिमित्ताने येईल.
 
"पक्षात फूट पडल्यानंतर जनसमर्थन मिळतंय का हे सुद्धा यात स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड केली असा आमदारांचा आरोप होता. त्यानंतर आता जनतेच्या दरबारात हा आरोप किती खरा ठरतो आणि मतदार कोणाला साथ देतात हे स्पष्ट होईल."

रमेश लटके दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यापूर्वी काँग्रेसचे सुरेश शेट्टी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. असं असलं तरी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुनील यादव यांचा केवळ जवळपास पाच हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2019 मध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली तरी त्यांना जवळपास 45 हजार 800 मतं मिळाली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शिंदे गटाच्या बंडानंतर ही पहिली निवडणूक आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सुद्धा बदललं आहे. त्यामुळे मतदार या परिस्थितीकडे कसं पाहतात याचा प्राथमिक निकाल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. खरा निकाल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी ही निवडणूक आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे."
 
Published By - Priya Dixit